महिलांना देखील मारहाण; १८ जणांविरोधात गुन्हा दाखल
। रोहा । वार्ताहर ।
कमी कष्टात लाखो रुपयांचा मलिदा मिळवून देणारा भंगार मालाचा ठेका मिळविण्यासाठी धाटाव एमआयडीसीमध्ये नेहमीच चढाओढ असते. या व्यवसायावरून पुन्हा एकदा दोन ठेकेदार व त्यांच्या गटात रविवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. लोखंडी पाईप, काठ्या व दगडांचा वापर करून लाखो रु. किंमतीच्याआलिशान गाड्या फोडण्यात आल्या आहेत. या राड्यात महिलांना देखील धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली आहे. या तुफान हणामारीत दोन्ही गटातील ९ जण जखमी झाले असून १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एमआयडीसी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही भंगार माफियांमुळे या एमआयडीसीला ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे.
रविवारी मध्यरात्री ठेकेदार विजय चंद्रकांत दळवी (रोहा ) व रमाकांत दास (रोहा) हे दोघे आपल्या गाडीतून धाटाव एमआयडीसीतील ईप्टेक कंपनीच्या गेट बाहेर फेरी मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी भंगाराने भरलेली गाडी त्या कंपनीतून बाहेर सोडली नाही. या गोष्टीचा राग धरून आरोपी लक्ष्मण चौधरी याने आपल्या ताब्यातील गाडी विजय दळवी यांच्या गाडी समोर उभी केली व दगडफेक करून विजय यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर आरोपी लक्ष्मण चौधरी, विमलेश चौधरी, अंकित चौधरी, सौरभ चौधरी, दीपांशु चौधरी व त्यांच्या सोबत आलेले अन्य ५ जणांनी संगणमत करून विजय दळवी यांच्या गाडीवर दगडफेक करून विजय दळवी, रमाकांत दास, दीपक डपळ ( धाटाव ) यांना काठ्या व लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यात तिघेही जखमी झाले आहेत.
दुसऱ्या तक्रारीत विजय दळवी व त्याचे सहकारी हे लक्ष्मण चौधरी यांच्या मुलांना व इतर नातेवाईकांना भंगार बाहेर काढण्या बाबत विरोध दर्शवून दमदाटी करित होते. या घटनेची माहिती ठेकेदार लक्ष्मण चौधरी यांना समजताच ते घरातील इतर सदस्यांसमवेत संबधित कंपनीच्या गेटवर आले असता आरोपी विजय दळवी, दीपक डपळ व इतर ४ अनोळखी इसम हे चौधरी यांच्या सोबत कंपनीत काम करणाऱ्या इसमांशी वादविवाद करित होते. रस्त्यावर आरोपी विजय दळवी यांची गाडी उभी होती. आणि विजय दळवी व दीपक डपळ, तसेच त्यांचे सहकारी हे अंकित चौधरी, दीपांशु चौधरी, सौरभ चौधरी, सोनिया केवठ यांना मारहाण करित असल्याचे दिसून आले. म्हणून लक्ष्मण चौधरी हे विजय दळवी व त्यांच्या सहकार्याने समजविण्याकरिता गेले असता त्यांना विजय दळवी व अन्य सहकार्यांनी त्यांना हाता बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात घरातील महिलांवर दगडफेक करून त्यांना रक्तबंबाळ केले गेल्याचे चौधरी यांच्याकडून सांगण्यात आले.