जमीन मालकाला न सांगताच घेतला ताबा
। पेण । प्रतिनिधी ।
गेल्या पाच वर्षांत पेण शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विकासाचा विचार करता पेण शहराच्या बाजूने वेगवेगळे पाच रिंगरोड मंजूर झाले आहेत. काही प्रमाणात त्या रिंगरोडची कामेदेखील झाली आहेत. रिंगरोडसाठी लागणार्या जागेला काही शेतकर्यांनी विरोध केला आणि त्यांनी न्यायालयाचे दरवाजेही थोटावले. परंतु, काहींनी पेणचा विकास व्हावा, यासाठी रिंगरोडला विरोध न करता जागा देण्याचे मान्य केले. मात्र, नगरपालिका प्रशासनाने त्याच शेतकर्यांना विश्वासात न घेता परस्पर जागेचा ताबा घेतला. शेतकर्यांना अंधारात ठेवून रस्त्याचे कामही पूर्ण केले. त्यामुळे पीडित शेतकर्यांनी संताप व्यक्त करीत नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांचा घोटाळाच उघडकीस आणला आहे.
पेण शहरातील सर्वे नं. 379 अ/3 मध्ये नगरपालिका प्रशासनाने गडबड केली आहे. ही जागा प्रशांत यशवंत टिळक व त्यांच्या कुटुंबियांची असून, त्यामध्ये साधे कुळ म्हणून ढवळे, गुरव, प्रधान, शिरसागर आदी आहेत. मात्र, नगरपालिका प्रशासनाने या जागेचे मूळ मालक प्रशांत टिळक यांच्याबरोबर कोणतेच कायदेशीर दस्त तयार केले नाहीत. ज्या वेळेला प्रशांत टिळक यांनी आपल्या जागेत केलेल्या रस्त्यासाठी नगरपालिकेने संमतीपत्र घेतले आहे का, याबाबत 11 नोव्हेंबर 2024 रोजी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली. त्यावेळी नगरपालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांनी आयडीयाची कल्पना लढवून 25 नोव्हेंबर 2024 रोजी घाईघाईने जमिनीचे साधे कुळ असणार्या ढवळे कुटुंबियांकडून संमतीपत्र तयार करून घेतले. संमतीपत्र हे जमीन मालकाबरोबर होणे गरजेचे होते. मात्र, असे न होता बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने संमतीपत्र घेतले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, संमतीपत्र घेण्यासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प पेपर हा नगरपालिकेच्या अधिकृत कर्मचार्यांनी घेणे गरजेचे होते. मात्र, तसे न होता सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी असलेल्या सौरभ थळे याला स्टॅम्प पेपर घेण्यास सांगितले. स्टॅम्प पेपर घेताना तो कोणत्या कामासाठी घेतला जात आहे, हे नमूद करणे गरजेचे होते. मात्र, त्यालाही बगल देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 25 नोव्हेंबरला संमतीपत्र करण्यात आले. परंतु, स्टॅम्प पेपरची खरेदी 26 नोव्हेंबर रोजी झाली आहे.
मुद्रांक विक्रेते दिनेश पाटील यांनी सांगितले की, ज्या कामासाठी स्टॅम्प वापरला जातो, त्याविषयी विचारणा केली जाते. सरकारी कार्यालयासाठी स्टॅम्प पेपर लागत असेल तर त्या कार्यालयाच्या अधिकृत कर्मचार्याकडे संमतीपत्र देणे गरजेचे असते. मात्र, जो स्टॅम्प विकत घेतला आहे, तो खासगी कामासाठी नेल्याचे नमूद आहे.
त्यातच टिळक, आंद्रे, शिंदे यांच्या जागेतून 18 मीटरचा रस्ता करण्यात आला आहे. मात्र, पुढे दोन घरे रस्त्यात आहेत. त्यांना नोटीस देण्याचीही तसदी नगरपालिका प्रशासनाने दाखवली नाही. बोरगाव रस्त्याच्या शेजारून पुढे जाणार्या रिंगरोडला एक बाजूला हिरव्या कलरचा बंगला असून, दुसर्या बाजूला निळ्या कलरची पत्र्यांची शेड आहे. याच्या मधोमध असणारी जागा ही सात ते आठ मीटरच आहे. बंगला शेड हे रस्त्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, ही बाब नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिसत नाही.
बांधकाम अभियंत्यांची सारवासारव
रिंगरोडची जागा संपादन आणि कामासंदर्भात बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांना विचारणा केली असता त्यांनी आपली चूक लपविण्यासाठी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणत्या मालकाने परवानगी दिली, याबाबत विचारणा केली असता नगरपालिका बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते. महत्त्वाची बाब म्हणजे, तोंडी संमती घेऊन विकासकामे होत असती तर रिंगरोडची कामे का थांबली असती? तसेच प्रशांत टिळक यांनी कोणत्याही प्रकारची तोंडी संमती दिली नव्हती, हेदेखील त्यांनी सांगितले.
शहराच्या विकासाला कधीच विरोध नसेल. परंतु, नगरपालिका प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने दंडेलपणे माझ्या जागेवर अतिक्रमण करून रस्ता एक ते दीड वर्षापूर्वी केला आहे. याबाबत पूर्वकल्पना देणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी न विचारता रस्ता केला. ते मला मान्य नाही. तसेच संमती अथवा जमिनीची ताबा पावती न करता जागेतील झाडे तोडली आहेत. हे चुकीचे आहे. याबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर चुकीच्या पद्धतीने ताबा पावती दाखविण्यात आली. याबाबत नगरपालिका प्रशासनाला न्यायालयात खेचल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याला जागा देत असतानाही नगरपालिका प्रशासन, कर्मचारी अशा प्रकारे अरेरावी करत असतील तर ते खपवून घेणार नाही.
प्रशांत टिळक,
जमीन मालक, पेण