पोलीस आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील बंदरावर गेल्या दोन दिवसांपासून खुलेआमपणे डिझेलची तस्करी सुरु होती. याबाबत सीमा शुल्क विभागाने कारवाई करीत सुमारे चार डिझेलचे टँकर व दोन मासेमारी बोटी जप्त केल्या आहेत. परिणामी, सीमा शुल्क विभागाच्या कारवाईने डिझेल तस्करांना दणका मिळाला आहे. या घटनेपासून रेवदंडा पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानादेखील याकडे दुर्लक्ष केल्याने पोलीस आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
26 नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर सागरी किनारा मजबूत करण्यासाठी सागरी किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सागरी पोलीस ठाण्यांमार्फत वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. किनारी भागात काही संशयित हालचाल दिसून आल्यास त्याची माहिती प्रतिसाद दिला आहे. परंतु, काही पोलीस ठाण्यातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मच्छीमार अवैध धंद्याची माहिती देण्यास टाळाटाल करीत आहेत. मागील काही महिन्यापुर्वी पनवेल पोलिसांनी डिझेलची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली होती. रेवदंडा बंदरातूनच हे डिझेल आणल्याची माहिती उघड झाली होती. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर ही तस्करी सुरु असतानाही त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याने पोलीसांच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
रेवदंडा पोलिसांच्या भुमिकेकडे संशय
रेवदंडा पोलीस ठाणे आणि रेवदंडा बंदर पाचशे ते हजार मीटर अंतरावर आहे. रात्रीच्यावेळी पोलिसांकडून गस्त घातली जाते. हाकेच्या अंतरावर असतानाही अवैधरित्या तस्करी करणाऱ्या बोटींवर व टँकरवर रेवदंडा पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या या भुमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे रेवदंडा पोलीसांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
राजकीय नेत्यांकडून अभय
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात डिझेल तस्करीसाठी होत आहे. डिझेल तस्कर राजू पंडित व कन्हैया यांची नावेही पुढे आली आहेत. या दोघांना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चाही आहे. दरम्यान, तस्करी रोखण्यासाठी वेगवेगळी यंत्रणा प्रयत्न करीत असते. परंतु, राजकीय दबावापोटी त्यांना कारवाईतुन माघार घ्यावी लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. सोमवारी पहाटे सीमा शुल्क विभागाने डिझेल तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली. परंतु, एका राजकीय बड्या नेत्याने त्यांना दमदाटी करीत ही कारवाई रोखल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांकडूनच डिझेल तस्करी करणाऱ्यांना अभय मिळत असल्याचे चित्र यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे डिझेलमध्ये हात ओले झालेला हा बडा नेता कोण? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
अशी होते तस्करी
रेवदंडा बंदरात रात्री साडेअकरानंतर टँकर येतात. पहाटेपर्यंत बोटीतून डिझेल टँकरमध्ये घेऊन तो डिझेल साठा वेगवेगळ्या ठिकाणी वितरीत करण्यासाठी नेला जातो. सीमा शुल्क विभागाने सोमवारी पहाटेच्या सुमारास रेवदंडा बंदरावर छापा टाकला. या छाप्यात डिझेलची तस्करी करणारी मंडळी दिसून आली. यावेळी संबंधित विभागाने कारवाई करीत कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केला. त्यामध्ये टँकरसह दोन बोटींचाही समावेश आहे.
रेवदंडा बंदरावर सीमा शुल्क विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे त्याची सविस्तर माहिती उपलब्ध नाही.
सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड