नऊगांव आगरी समाजाचे निषेध मोर्चाचे आयोजन
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील विहूर येथील मेहबूब एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी माजी सैनिक मुकेश नाक्ती यांचा मुलगा मानस याला जबर मारहाण करण्याची घटना घडली होती. त्यावेळी हल्लेखोरांनी मानस याला गळा आवळून ठार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी हल्लेखोरांवर व शाळा व्यवस्थापनावर अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याने नऊगांव आगरी समाज लवकरच याविरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करणार आहे. याबाबतचे एक निवेदन तहसीलदार रोहन शिंदे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मानस या विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्यात आली असून त्याचा गळा आवळून ठार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या संदर्भात आरोपींवर कारवाई व्हावी याकरिता निवेदन देण्यात आले होते. शिवाय शाळेच्या विद्यार्थ्यांवर व शाळेच्या कार्यक्रमावेळी शाळेच्या आवारात घडलेल्या घटनेच्या संदर्भात शाळा व्यवस्थापनाकडून गुन्हा नोंद होणे गरजेचे होते. परंतु, शाळा व्यवस्थापन पीडित मुलाला शाळेतून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहे, हे अतिशय निंदनीय आहे. कारवाई करण्यात प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष व दिरंगाई करीत आहे. समाजाच्यावतीने प्रशासनाला वेळ देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती. परंतु, समाजाच्या विनंतीला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. या सगळ्याचा निषेध म्हणून आगरी समाजाच्यावतीने 24 जानेवारी रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे निवेदनात लिहीले आहे.
यावेळी नऊगांव आगरी समाज अध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष मदन भोईर, सचिव विद्याधर नाईक, माजी उपाध्यक्ष नरेश वारगे, सचिव मनोज कमाने, मनीष माळी, प्रमोद तांबडकर, शांताराम आरकशी, अंकुश मोहिते, नंदकुमार गायकर व सदस्य उपस्थित होते.