| नेरळ | वार्ताहर |
नेरळ गावच्यावतीने नेरळ ते श्री क्षेत्र एकविरा आई कार्ला पालखी सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. यावर्षीदेखील सोमवारी (दि.20) नेरळ ते श्री क्षेत्र आई एकविरा कार्ल्याच्या डोंगरावर पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी पालखीचे पाचवे वर्ष असून या पदयात्रेत सुमारे 1 हजार 200 भाविक सामील झाले होते. यावेळी, ‘आम्ही हाव आईचे पदयात्री’, ‘त्रैलोक्याची माय आमची कार्ले गावाची एकविरा आय’, ‘आई माऊलीचा उदो उदो’ अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात ही नेरळ गावाची मानाची पालखी नेरळ हेटकर आळी येथील गणपती मंदिरातून सकाळच्या सुमारास निघाली. यावेळी अनेक मान्यवर तसेच गावातील महिला, ज्येेष्ठ व तरूणवर्ग या पालखीत सहभागी होते. नेरळ ते एकविरा कार्ला डोंगर असा सुमारे 65 कि.मी अंतर हे भावीक 2 दिवसात पार करणार आहेत. पहिला दिवस खोपोलीत मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्ल्याच्या डोंगरावर पोहचणार असून दुसऱ्या दिवशी भक्त आई एकविरा देवीचा आशिर्वाद घेऊन पालखीची सांगता होणार आहे.