| रायगड | खास प्रतिनिधी |
ग्रामीण गृहनिर्माण सहकारी संस्था या आधुनिक सहकार क्षेत्रातील आधारस्तंभ बनत असून, त्यांनी सहकारातील अधिकाधिक ज्ञान संपादन करावे आणि आवश्यक त्या नियमाप्रमाणे आपल्या सहकारी संस्था अधिक सक्षम बनवाव्यात, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांनी केले.
2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जगभरात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने सहकार विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, संस्थेचे सभासद व कार्यकारी मंडळांना आपल्या अधिकार व कर्तव्याची जाणीव व्हावी, या उद्देशाने जिल्हा उपनिबंधक रायगड व सहाय्यक निबंधक पनवेल आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गृहनिर्माण सहकारी संस्थांचा प्रशासकीय व आर्थिक व्यवस्थापन प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, अलिबाग सहकारी संस्था सहाय्यक उपनिबंधक श्रीकांत पाटील, पनवेल सहकारी संस्था सहाय्यक उपनिबंधक भारती काटुळे, जिल्हा बँकेचे अधिकारी आणि गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीप्रसाद परब यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा सहकारी बँक देत असणार्या विशेष सेवांबाबत माहिती दिली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सदैव जिल्हा सहकारामध्ये असणार्या अनेक सहकारी संस्थांना मदत करण्यासाठी तत्पर असून ग्रामीण गृहनिर्माण सहकारी सोसायटी यांच्या मदतीसाठी बँकेने आवश्यक ते अनेक बदल आपल्या प्रणालीमध्ये केले आहेत. यावेळी बँकेचे सीनियर मॅनेजर संदीप जगे यांनी बँकेच्या वाटचालीविषयी सादरीकरण केले. यावेळी अलिबाग सहकारी संस्था सहाय्यक उपनिबंधक श्रीकांत पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना कायद्यामध्ये नव्याने झालेले बदल याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी संत साहित्य सहकार व मानवी विकास आदी गोष्टींची सांगड घालणारा अवघा रंग एक झाला या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते गणेश शिंदे यांनी निरूपण केले तर गायिका सन्मिता शिंदे यांनी त्यांना संगीत साथ दिली. सन्मिता शिंदे यांनी गायलेल्या अभंग व कबीरांच्या दोह्यांनी उस्थितांची मने जिंकली.
यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, अलिबाग सहकारी संस्था सहाय्यक उपनिबंधक श्रीकांत पाटील यांनी दिली. पनवेल सहकारी संस्था सहाय्यक उपनिबंधक भारती काटुळे यांनी गृहनिर्माण संस्थांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त करताना गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेच्या कळंबोली शाखेच्या शाखाधिकारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.