वादळी पावसाचा बागायतीला फटका

| रायगड । प्रतिनिधी ।

उशिराने आलेला आंब्याची काढणी सुरू असतानाच आलेल्या वादळी पावसाने बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी यंदा फेब्रुवारीमध्ये आंब्याला मोहर आला होता. फळधारणेनंतर वाढही जोमात होत होती, मात्र सोमवारी आलेल्या वादळा पावसाने फळ गळती झाली. यंदा आंब्याचे उत्पादन जेमतेम 40 टक्केच झाले होते. त्यात वातावरणातील बदलाचा फटका सातत्याने बसत आहे.

सुरुवातीला कडाक्याची थंडी आणि एप्रिलमध्ये उष्मालाटेमुळे फळधारणा व्यवस्थित झालीच नाही, असे येथील आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. या सर्व संकटांवर मात करून शिल्लक राहिलेली फळे मंगळवारच्या वादळी पावसात गळून पडली. उशिराने फळधारणा झालेली फळे साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यायोग्य होतील, असा अंदाज होता. रोहा, श्रीवर्धन येथील बागायतदारांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडावर तयार होत असलेली 80 टक्के फळे खराब झाली आहेत. आता यापुढे बाजारात येणार्‍या आंब्याची आवकही कमी होणार असल्याने त्याचा परिणाम किमतीवर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पिकवण्यासाठी काढलेली फळे सुरक्षित आहे. ती फळे व्यवस्थित पिकवण्याकडे आता बागायतदारांचे लक्ष राहणार आहे. कर्जत, खालापूर, पेण अलिबाग तालुक्यांमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वार्‍यासह धुळीचे लोट वाहत होते. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला असून महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करीत आहेत.

15 मेपर्यंत यलो अलर्ट
जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण होते. महाड, पोलादपूरमध्ये शनिवारी तर सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबईसह, कोकण आणि कोल्हापूरमध्ये अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने 15 मेपर्यंत यलो अलर्ट दिला आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसतो आहे. रायगड जिल्ह्यात मेच्या मध्यावर आंबा पिकाची काढणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा अवेळी आलेल्या पावसाने आंबा पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातून शिल्लक राहिलेल्या आणि काढणीला आलेल्या आंब्याला वादळी पावसाचा फटका बसला आहे. तयार झालेला आंबा गळून पडला आहे. माणगाव, रोहा भागात कापणी होत असलेल्या उन्हाळी भातपिकाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तर वीटभट्टी व्यवसायालाही अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने कालव्याच्या पाण्यावर पिकणार्‍या उन्हाळी भात शेतीसह आंबा, फणस, कोकम फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. वीटभट्ट्या, भाजीपाल्याचे पिकाचेही नुकसान झाले आहे.
Exit mobile version