| श्रीवर्धन | वार्ताहर |
अवकाळी पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पडझड झाली आहे. सायंकाळ दरम्यान विद्युत वाहक तारांवर फांद्या पडल्याने श्रीवर्धन येथील वीजपुरवठा देखील आठ तास खंडीत झाला होता. तसेच, येथील आंबा व काजू पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
श्रीवर्धन तालुक्यात गेले दोन दिवस सुरू असलेली पावसाची रिपरिप व वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्यातच बुधवारी (दि.21) सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे श्रीवर्धन येथील काही भागात विद्युत वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक सेवा बंद असल्याने आपापल्या कामांसाठी श्रीवर्धन येथे आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागले. त्याचबरोबर आंबा व काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांना चांगली फळधारणा होत असतानाच वादळी वाऱ्यामुळे फळ गळुन पडली आहेत. आंबा पॅकिंग करीता आणलेला पुठ्ठी खोका व पेंढ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. उर्वरीत फळे वाऱ्यामुळे खाली पडून आणखी नुकसान होऊ नये यासाठी आंबा बागायतदारांनी फळं झाडावरून उतरण्यास सुरुवात केली आहे.