चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यास दिरंगाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आक्षीनंतर आता रेवदंडा येथील मोठा कोळीवाडा येथे मंदिरातील चांदीच्या देवाच्या मूर्ती लंपास करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. ही घटना घडून आठ दिवस झाले आहेत. मात्र, अजूनपर्यंत रेवदंडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याची चर्चा आहे. रेवदंडा पोलिसांचा अजब कारभार यातून उघड होत आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्याशी विचारणा केली असता, त्यांना काहीच माहिती नसल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी या घटनेपासून अनभिज्ञ असल्याने रेवदंडा पोलिसांच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेवदंडा येथील मोठा कोळीवाडा येथील एका मंदिरात घुसून चोरट्यांनी चांदीचे चार देव, देवीचा चांदीचा मुखवटा लंपास केल्याची माहिती तेथील स्थानिकांकडून उपलब्ध झाली. ही घटना गुरुवारी घडली आहे. याबाबत तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अजूनपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. घटना घडून अनेक दिवस उलटूनही रेवदंडा पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात दोन चोरी, घरफोडीच्या घटना घडूनही त्याची नोंद होत नाही, त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
रायगडच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात कडक पावले उचलली आहेत. कामामध्ये गैरप्रकार करणाऱ्या पोलिसांविरोधात कारवाई करण्यात येत असताना, अवैध धंदे चालकांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेवदंडा पोलिसांच्या या प्रतापाबाबत पोलीस अधीक्षक योग्य ती दखल घेऊन कारवाई करतील, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेबाबत रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी चोरी, घरफोडीच्या घटनांबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे रेवदंड्यातील प्रभारी अधिकारी या गंभीर घटनांबाबत अनभिज्ञ असल्याने वेगवेगळ्या चर्चेला ऊत येत आहे.
रेवदंडा येथील कोळीवाड्यामधील मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेबाबत काहीच माहिती नाही. तरीदेखील खात्री करून सांगतो.
श्रीकांत किरवले,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, रेवदंडा
