शिवजयंती ऐवजी दिल्या सुट्टीच्या शुभेच्छा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
19 फेब्रुवारीची शिवजयंतीची सुट्टी मिळावी, याकरीता शासनाच्या अखत्यारीतील मत्स्यव्यसाय आयुक्तालयाने 18 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करण्याचा प्रताप केला आहे. महाराष्ट्र फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी ही बाब व्हीडीओ क्लीप प्रसिध्द करून लक्षात आणून दिल्याने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम तारखेच्या एक दिवस आधीच केवळ शासकीय सुट्टी उपभोगता यावी, म्हणून साजरी करणाऱ्या मत्स्यव्यसाय आयुक्तालयाच्या या उद्योगामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. विषेश म्हणजे यावेळी झालेल्या भाषणांमध्ये शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्यानिमीत्त मिळणाऱ्या सुट्टीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची शासनमान्य तारीख आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी असली तरी शिवजयंतीसाठी तास दोन तास खर्च करून सरकारी अधिकारी यांनी कार्यालयात जाऊन 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करणे योग्य ठरले असते. परंतु, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना सुट्टीचा एवढा हव्यास असतो की, त्यांनी छत्रपतींचा जन्म एक दिवस आधीच साजरा केला असल्याची टिका नाखवा यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच शुक्रवार दि.19 फेब्रुवारी ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी सुट्टी जाहीर करते. मात्र, या दिवशीच ती साजरी करणे आवश्यक असताना कर्मचाऱ्यांनी केवळ सुट्टीसाठी असे प्रताप करणे, निंदनीस असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेे.