वादग्रस्त रेशन दुकानदारास पाठीशी घालण्याच्या प्रयत्नाने तक्रारदार संतप्त
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कडाव गावातील रेशन दुकानदार यांच्याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या असंख्य तक्रारी होत्या. त्याबाबत स्थानिकांनी कर्जत तहसील कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार पुरवठा विभागाने त्या तक्रारीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तक्रारदार यांना दलवुन रेशन दुकानदार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पुरवठा विभाग करीत असल्याचा आरोप स्थानिक तक्रारदारांनी केला आहे.
लाभार्थीना धान्य वाटपात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करणार्या कडाव गावातील रेशनधान्य दुकानदाराची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी यासाठी सुमारे 150 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन कडाव गावातील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन हरिश्चंद्र दुघड यांनी कर्जत तहसीलदार यांना नेऊन दिले होते. कर्जत पुरवठा विभागाच्या वतीने कडाव ग्रामपंचायत कार्यालयात रेशन दुकानदाराची चौकशी करण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली होती. सदर चौकशीच्या सुनावणी पत्रात अर्जदारांना तक्रार अर्जावर स्वाक्षरी/ अंगठे दिलेल्या तक्रारदारांपैकी 10% लाभार्थी तक्रारदारांना घेऊन उपस्थित रहण्याचे तसेच वेळेवर उपस्थित न राहिल्यास आपणास काही सांगायचे नाही असे समजून अर्ज निकाली काढण्यात येईल असे आदेश देण्यात आले होते. तक्रारदार गोळा झाले पण चौकशीकामी कर्जत पुरवठा विभागाचे कुणीही अधिकारी दुपार झाली तरी उपस्थित न राहिल्यामुळे लाभार्थी तक्रारदार कंटाळून निघून गेले.
शेवटी लाभार्थी तक्रारदार निघून गेल्यानंतर पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक अधिकारी बि. टि. बुरसे व गोडाऊन तपासणीस निकाळजे हे सुनावणी असलेल्या सभागृहात दाखल झाले. त्यामुळे चौकशीचे कागदी घोडे नाचवणा-या कर्जत पुरवठा विभागातील अधिकार्यांनी लाभार्थी तक्रारदारांचा जबाब न घेता भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या वादग्रस्त रेशन दुकानदाराने जमवलेल्या नागरिकांचा जबाब घेतल्याने तक्रारदार लाभार्थी संतप्त झाले.
शासकीय सुनावणी असूनदेखील भ्रष्टाचाराचे आरोप असलेला रेशन दुकानधारक चौकशीसाठी आलेल्या कर्जत पुरवठा अधिका-यांना पाण्याच्या बाटल्या, वडापाव, चहापाणी देत होता. याबाबत सुनावणीचे पत्र काही मिनिटे अगोदर मिळाले होते तर मग, तक्रारदार लाभार्थ्याने सुनावणीस हजर रहायला नको होते व सुनावणी पुढे ढकलण्यात यावी असे पत्र द्यायला हवे होते. सुनावणीस उपस्थित रहायला थोडा वेळ झाला तरी तक्रारदारांनी थांबायला पाहिजे होते.
बि.टि. बुरसे, पुरवठा निरीक्षक अधिकारी