तालुक्यात 375 लाखांचे विजबिल थकीत
। म्हसळा । वार्ताहर ।
विज वितरण कंपनीचे महाराष्ट्रात थकीत बिलांचे प्रमाण वाढले असून महावितरण कंपनीने आता वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. म्हसळा तालुक्यातील महावितरण कंपनीच्या आंबेत, खामगांव, मेंदडी, म्हसळा-1 आणि म्हसळा-2 या पाच डीटीसी विभागात 121 वीजग्राहकांनी 375.88 लाख रुपयांचे विजबिल थकविले आहे, यात म्हसळयातील 39 ग्राम पंचायतींचा समावेश असल्याचा खुलासा म्हसळा उपकार्यकारी अभियंता प्रदिप पटवारी यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीच्या पथदिवे वीजबिल थकबाकीअभावी ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन खंडीत करण्याचा एककलमी कार्यक्रम महावितरणाने हाती घेतला आहे. त्यामुळे या वसुलीचा झटका म्हसळा नगर पंचायत वगळता तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीमधील 84 गाव, वाडीवस्तींना बसला आहे. गेली कित्येक दिवसांपासून म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील पथदिवे वीजबिल भरणा न केल्याने बंद आहेत. यात जनतेचा दोष काय, जनतेने दिवाबत्ती कर ग्रामपंचायतीकडे भरणा केला आहे. महावितरण कंपनी आणि ग्रामविकास विभाग यांचा समन्वय नसुन त्यांच्या निष्क्रियतेमुळे भर पावसाळ्याच्या दिवसात विज पुरवठा खंडीत करून जनतेला त्रास होत आहे. दरम्यान पथदिवे तातडीने चालु करा, अन्यथा जनता रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा चंद्रकांत खोत यांनी दिला आहे.
एकूण थकबाकी
आंबेत – 20 ग्राहक, 50.56 लाख रूपये
खामगांव – 20 ग्राहक, 46.42 लाख रूपये
मेंदडी – 15 ग्राहक, 54.23 लाख रूपये
म्हसळा 1 – 37 ग्राहक, 135.37 लाख रूपये
म्हसळा 2 – 29 ग्राहक, 89.29 लाख रूपये