जनावरांमधील ताण होणार कमी

पशू सल्ला देणारे अ‍ॅप विकसित; पुण्यातील संशोधकांची कमाल

। पुणे । वृत्तसंस्था ।

सध्याच्या काळात माणसांमध्येच ताणतणाव असतो, असा समज आहे. परंतु जनावरांमध्येही ताणतणाव असतो, हे राहुरी कृषी विद्यापीठाच्या पुण्यातील कृषी महाविद्यालयातील संशोधकांना दिसून आले आहे. यावर कायमस्वरूपी उपाय काढण्याच्या उद्देशाने या संशोधकांनी खास अ‍ॅप विकसित केले आहे. जनावरांमधील ताण-तणाव कसे दूर करावेत, संभाव्य उष्माघातापासून त्यांचा बचाव कसा करावा याचा सल्ला शेतकर्‍यांना आता घरबसल्या एका क्लिकवर मिळेल. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने सुरु केलेल्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रातील संशोधकांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे. ते तापमान आर्द्रता निर्देशांकावर आधारित आहे. अशा पद्धतीचे हे देशातील पहिलेच अ‍ॅप ठरले आहे.

सध्या जागतिक तापमानवाढ आणि याचा विविध क्षेत्रांवरील परिणामांवरून अनेकदा चर्चा झडते, परंतु दुभत्या गाई-म्हशींवर नेमका काय परिणाम होतो, याची फारशी चर्चा होताना दिसत नाही. उष्माघातामुळे दुभत्या गाई-म्हशींचे आरोग्य आणि संभाव्य दूध उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. दूध उत्पादन आणि जनावरांची प्रजनन क्षमता दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या आणि दूध उत्पादन वाढविण्याच्या हेतूने संशोधक डॉ. सोमनाथ माने व डॉ. धीरज कंखरे यांनी अ‍ॅप तयार केले. त्यांना डॉ. महानंद माने व डॉ. सुनील कदम यांचे सहकार्य मिळाले.

विशेषतः उन्हाळ्यात तापमानात वाढ होते. अशावेळी जनावरांना उष्माघात होतो. परिणामी दूध उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. याचा सर्वाधिक फटका संकरित गाई किंवा विदेशी गाईंना बसतो. यामुळे दूध उत्पादन सरासरी 30 टक्क्यांनी कमी होते. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी अ‍ॅपचा शेतकर्‍यांना फायदा होईल, असे डॉ. सोमनाथ माने यांनी सांगितले.

अ‍ॅपमुळे होणारे फायदे..
शेतकर्‍यांना गोठ्यातील तापमान आर्द्रतेच्या आधारे निर्देशांक मिळणार.
या निर्देशांकावर आधारित शेतकर्‍यांना घरबसल्या सल्ला मिळणार.
तापमान आर्द्रता निर्देशांक जास्त वाढल्याचे समजताच त्वरित उपाययोजना करता येणार.
गोठ्यामध्ये पंखा, पाणी फवारणी यंत्रणा स्वयंचलित होणार.
जनावरांचे गोठ्यातील नियोजन, चारा व आहार नियोजन, खाण्याच्या वेळा, पाणी नियोजन याबाबत मार्गदर्शन मिळणारगोठ्यामध्ये तापमान व आर्द्रता यांचे सेन्सर बसवून गोठ्यातील माहितीच्या माध्यमातून मोबाईलवर निर्देशांक कळणारशेतकर्‍यांना विविध सूचना मिळू शकणार.

दुभत्या गाईंमध्ये होणारा उष्माघाताचा परिणाम काही प्रमाणात कमी करण्यास हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. शिवाय दूध उत्पादनही वाढण्यास मदत होणार आहे.

डॉ. प्रशांतकुमार पाटील
(कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
Exit mobile version