मॉडिफाईड साइलेंसर विरोधात धडक कारवाई

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

वाहनांना मॉडिफाईड साइलेंसर बसवून मोठ्या आवाजात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कळंबोली वाहतूक शाखेने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. मागील दोन महिन्यांत वाहतूक शाखेने 23 कारवाया करून मोठ्या प्रमाणात मॉडिफाईड साइलेंसर जप्त केले आहेत. या कारवाईत पोलीस शिपाई अमोल साळेकर यांनी सर्वाधिक 20 साइलेंसरवर कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांची विभागात ‘सायलेन्सर मॅन’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त साकोरे आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुमार सरतापे यांच्या नेतृत्वाखाली मॉडिफाईड साइलेंसर लावून रस्त्यावर ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

मॉडिफाईड साइलेंसरमुळे वाहनांचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा वाहनांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण होते. याची दखल घेत कळंबोली वाहतूक शाखेने कारवाईचा वेग वाढविला आहे. मागील दोन महिन्यांत करण्यात आलेल्या 23 कारवायांपैकी 20 कारवाया पोलीस शिपाई अमोल साळेकर यांनी केल्या आहेत. वाहनचालकांनी आपल्या वाहनांना नियमबाह्य मॉडिफाईड साइलेंसर बसवू नयेत, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुमार सरतापे यांनी केले आहे. तसेच अशा प्रकारचे साइलेंसर बनवून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही भविष्यात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांना ध्वनी प्रदूषण करणारे वाहन आढळल्यास संबंधित वाहनाचा क्रमांक किंवा छायाचित्र कळंबोली वाहतूक शाखेकडे पाठवावे. त्यानुसार संबंधित वाहनावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असेही वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version