परीक्षा केंद्रांभोवती 50 मीटर परिसर सीलबंद
| अलिबाग | प्रतिनिधी |
फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या इयत्ता बारावी व दहावीच्या सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारमुक्त, पारदर्शक आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी रायगड जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व परीक्षा वितरण केंद्रे आणि परीक्षा केंद्रांवर लागू राहणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा दि. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षा दि. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहेत. या कालावधीत संबंधित सर्व परीक्षा केंद्रांवर कडक निर्बंध लागू असतील. मनाई आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात मोबाईल फोन व पेजर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एस.टी.डी. बूथ, झेरॉक्स मशिन आणि फॅक्स मशीन चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक पेपरच्या 24 तास आधीपासून परीक्षा केंद्रांच्या 50 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, प्रत्येक पेपरच्या एक तास आधीपासून ते पेपर संपल्यानंतर एक तासापर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षार्थी विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात फिरण्यास मनाई राहणार आहे. परीक्षेसाठी आवश्यक साहित्याव्यतिरिक्त कोणतेही आक्षेपार्ह साहित्य वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व शिक्षा करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.







