जिल्ह्यात पावसाची दमदार सुरुवात

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नदी, विहीरींबरोबरच शेतांमध्येदेखील पाणी साचू लागले आहे. आतापर्यंत 495.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. येत्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नदी, दरडी लगत असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 9 तारखेनंतर पावसाने सुरुवात केली. त्यामुळे भात पेरणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असल्यसामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण झाले होते. अखेर गेल्या दोन दिवासांपासून जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 44.7 टक्के पाऊस पडला आहे. सर्वात जास्त अलिबाग, त्याखालोखाल मुरूड, माणगांव, तळा, म्हसळा, पनवेल तालुक्यांमध्ये पाऊस पडला आहे. पाऊस पडल्याने शेतकर्‍यांसह नागरिक सुखावून गेले आहेत. अनेकांनी भिजून पावसाचा आनंद लुटला. काहींनी पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट, छत्रीचा आधार घेतला. तर काहींनी मिळेल त्याठिकाणी थांबून पावसापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला.

सकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने खांदा वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणावर पानी भरले आहे. तसेच, सायन-पनवेल महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहन चालकाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

खांदा वसाहत येथील सखोल भागातील पाणी काढण्याकरता पालीकेने लावलेला पम्प अनेक वेळा चालूमध्यचे बंद पडत होता.

पनवेल परिसरात मुसळधार पावसाने शाळेत जाणारे विद्यार्थी आणि पालक वर्गाला मोठी कसरत करावी लागत होती.

पावसाळा सुरुवात होताच पनवेलमधील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना खड्डा चुकवण्याकरता कसरत करावी लागत आहे.

यलो अलर्टचा इशारा
रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस कोसळणार आहे. शुक्रवारी (दि.21), शनिवारी (दि.22) असे दोन दिवस यलो अलर्टचा तसेच रविवारी (दि.23) ग्रीन अलर्ट व सोमवारी (दि.24) यलो अलर्टचा इशारा दिला आहे.
पडलेल्या पावसावर दृष्टीक्षेप

तालुके   -  आतापर्यंत पडलेला पाऊस ( मि. मी. )

अलिबाग  -     291.1
पनवेल     -     152.1
कर्जत      -       85.1
खालापूर  -     129.7
उरण       -     124.7
सुधागड   -     166.1
पेण          -     182.6
महाड      -     198.8
माणगांव   -     248.7
रोहा         -     137.8
पोलादपूर  -    187.9
मुरूड      -     298.9
श्रीवर्धन    -      239.1
म्हसळा    -     253.1
तळा        -     250.5
------------------------------------
एकूण     - 195.4 मि. मी.

महावितरणचा खेळखंडोबा
रायगड जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात महावितरणचे जाळे पसरले आहे. लाखो ग्राहक महावितरणशी कनेक्ट आहेत. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून महावितरणचा खेळ खंडोबा सुरु असल्याचे समोर आले आहे. सतत वीज पूरवठा खंडीत होण्याचा प्रकार वाढत आहे. उन्हाळ्यामध्ये झाडांच्या फांद्या तोडणे, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज पुरवठा खंडीत केला होता. पावसाळ्यात वीज पूरवठा चालू राहण्याची अपेक्षा होती. मात्र, अलिबाग शहरासह जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिकांना अंधारात राहण्याचे संकट संपेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अलिबाग शहरातील वीज पुरवठा दुपारपासून खंडीत झाला आहे. ग्रामीण भागातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याकडे महावितरण विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
Exit mobile version