एसटीचा बेजबाबदारपणाचा कळस

जाहिरात फलकाचा तुटलेल्या लोखंडी फलकाकडे दुर्लक्ष; प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची शक्यता


| पेण | प्रतिनिधी |

पेण बस आगारमध्ये जाहिरातींचे फलक लावण्यासाठी तयार करण्यात आलेला लोखंडी सांगाडा ऊन, वारा, पावसाच्या आघाताने सडलेला आहे. दोन दिवसांपूर्वी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे यातील काही लोखंडी रॉड खाली पडले, तर काही तुटलेल्या अवस्थेत लटकताना दिसत आहेत. दररोज हजारो प्रवाशांची या स्थानकात ये-जा सुरू असते. एखादा रॉड तुटून प्रवाशाच्या डोक्यात पडला तर मोठी दुर्घटना घडून प्रवाशाच्या जिवावर बेतू शकते. याबाबत आगारप्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी कागदी घोडे नादवण्यात धन्यता मानली.

पेण आगारात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ पाहावयास मिळते. त्यातच सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे लोंबकळणाऱ्या जाहिरातीच्या लोखंडी सांगड्यातील रॉड प्रवाशांच्या डोक्यात पडल्यास मोठा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, याबाबीकडे एस.टी. आगारप्रमुखांचा अथवा तेथील कर्मचाऱ्यांचा अजिबात लक्ष नाही.
याविषयी विचारणा करण्यासाठी आगारप्रमुख अपर्णा वर्तक यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी स्वःखर्चाने या सांगाडा काढायचे ठरवले होते; परंतु जिल्हा कार्यालयाने परवानगी दिली नाही. आता त्याबाबत वरील कार्यालयात परवानगी मागितली असून, लोखंडी सांगाडा काढण्यासाठी निविदादेखील काढल्या आहेत. लवकरात लवकर तुटलेला सांगाडा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

एकंदरीत, अधिकारीवर्गाला कागदी घोडे नाचविण्यात रस आहे. त्यांना प्रवाशांच्या सुरक्षेबाबत घेणे देणे नाही, असेच म्हणावे लागेल. कारण, आताच्या स्थितीला लोखंडी रॉड लोंबकळताना दिसतात. ते तातडीने काढणे गरजेचे आहे; परंतु अधिकारी परवानग्या घेण्यात धन्यता मानत आहेत.

Exit mobile version