नवीन पनवेलमधील शांतीनिकेतन स्कूल प्रकरण तापले
| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल येथील शांतीनिकेतन स्कूलमध्ये इयत्ता सहावीतील आदित्य गणेश बोरकर या विद्यार्थ्याला फी थकबाकीच्या कारणावरून वार्षिक परीक्षेस बसू न दिल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.
आदित्य बोरकर हा विद्यार्थी नर्सरीपासून संबंधित शाळेत शिक्षण घेत आहे. पालकांनी यावर्षी काही रक्कम शुल्क भरलेली असतानाही उर्वरित फी बाकी असल्याचे कारण देत शाळा व्यवस्थापनाने त्याला परीक्षेस मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गणिताचा पेपर सुमारे अर्धा तास उशिराने देण्यात आला, तर इंग्रजी विषयाच्या परीक्षेला पूर्णपणे बसू न दिल्याचेही पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला पेपर न देता घरी परतावे लागले.
या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याची तसेच शैक्षणिक भविष्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. तक्रारदारांनी भारतीय राज्यघटनेतील कलम 21(अ)चा उल्लेख करत शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार असल्याचे नमूद केले आहे. फी वसुली हा शाळा व पालकांमधील आर्थिक विषय असला, तरी विद्यार्थ्यांना परीक्षेतून रोखणे कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महादेव वाघमारे यांनी संबंधित विद्यार्थ्याचा इंग्रजी विषयाचा पेपर पुन्हा घेण्याचे तसेच पुढील सर्व परीक्षांना बसण्याची परवानगी देण्याचे आदेश शाळेला द्यावेत, अशी मागणी केली आहे. यासोबतच तालुक्यातील सर्व शाळांना फी थकबाकीच्या कारणावरून विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय न मिळाल्यास शाळेसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा वाघमारे यांनी दिला आहे. त्यामुळे नवीन पनवेल परिसरात या घटनेची चर्चा सुरू असून, शिक्षण विभागाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
