शिक्षक अडकले गणवेश, बुटाच्या हिशोबात
| रायगड | प्रतिनिधी |
यंदापासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशासह बुट आणि पायमोज्याचे दोन जोड देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही योजना राबवतांना शाळा व्यवस्थापन समितीऐवजी योजनेचा निधी गणवेश, बुट, पायमोजे पुरवणाऱ्या पुरवठादार अथवा दुकानदार यांना थेट अदा करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाने गणवेश, बूट आणि पायमोजे या खरेदीसाठी निधी देऊन शिक्षकांकडून त्याचा हिशोब मागितला आहे. यामुळे प्राथमिक शिक्षकांना आता गणवेश आणि बुटांचे जोड खरेदी करून त्यांची बिले गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला सादर करावी लागत आहे. यामुळे अध्यापनाऐवजी त्यांचा अधिक वेळ गणवेश, बुट आणि पायमोज खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप करण्यासोबत त्याचा हिशोब ठेवण्यात खर्च होत आहे. यामुळे शासनाच्या धोरणामुळे शिक्षक मेटाकुटीला आले असून दुसरीकडे सध्या बाजारात स्काउट व गाईडच्या गणवेशाचा तुटवडा असल्याने हा गणेवश कोठून खरेदी करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शालेय शिक्षण मंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने मोफत गणेवश पुरवण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र, ऐवढ्या मोठ्या प्रमाणात शासन गणेवश कोठून आणणार असला प्रश्न असतांना काही कालावधीनंतर हा निर्णय मागे घेत पूर्वीप्रमाणे गणवेशासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सरकारच्यावतीने गणवेशाच्या दोन जोड यासाठी प्रती विद्यार्थी 600 रुपये देण्याची घोषणा झाली. या गणवेशात एकजोड स्काउट आणि गाईडचा घेण्यात यावा, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला. मात्र, हे करत असतांना बाजार ऐवढ्या मोठ्या प्रमाणात स्काउट आणि गाईडचे गणेवश उपलब्ध आहेत की नाही, याची खातजमा करण्यात आली नाही. एकदम आदेश आल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची स्काउट आणि गाईड गणवेशासाठी एकच झुंबड उडाली.
पूर्वी गणवेशाचा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग केल्यावर ही समिती गणवेश खरेदी करून त्याचे बिल अदा करत होती. मात्र, आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संख्येनूसार गणवेश आणि बुट, पायमोजे खरेदी करून त्याची विद्यार्थ्यांची यादी आणि खरेदीचे बिल त्यात्या तालुक्याच्या गटशिक्षण विभागातील लेखाविभागाला सादर केल्यानंतर ते संबंधीत पुरवठादार अथवा दुकानदार यांच्या खात्यावर खरेदीचा निधी वर्ग करण्यात येत आहे. मात्र, योजना राबतांना संबंधीत गणेवश, बुट आणि पायमोजे यांचा हिशोब ठेवताठेवता शाळेतील शिक्षकांचे अध्यपनाचे गणित बिघडल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील 1 लाख 3 हजार 364 विद्यार्थ्यांना दोन गणवेश, बुट आणि पायमोजे देण्यात आले आहेत. यासाठी शासनाने 7 कोटी 95 लाख 90 हजार 280 रुपयांचे अनुदान मंजूर करून वर्ग करण्यात आहे. स्काउट व गाइड शिक्षणाची संस्कार क्षमता विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांंना स्काउट आणि गाईड गणवेश खरेदीसाठी प्रती विद्यार्थी 300 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह बुट आणि पायमोजाच्या दोन जोडसाठी प्रती विद्यार्थी 170 रुपयांचे अनुदान देण्यात आले असून 300 रुपयात स्काउट आणि गाईडच्या गणवेशाचा जोड आणि 170 रुपयात बुट आणि पायमोजाचे दोन जोड कसे विकत घ्यायचे? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. साधा रेडिमेड गणवेश घ्यायचा असला तरी हजार-बाराशे रुपयांच्या वरती पैसे लागतात, तर बुटासाठी जवळपास तीनशेच्या वरच किंमती आहेत, असे असताना केवळ तीनशे रुपयांत गणवेश आणि 170 रुपयांत बूट व पायमाजे विकत मिळत नसल्याने शिक्षकांच्या नाकीनऊ आले आहेत. दरम्यान, स्काऊट आणि गाईडचा गणवेश न मिळाल्यास त्यासारखा दिसणार गणवेश खरेदी करावा, अशा सूचना शिक्षकांना दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.