नगरपरिषद शाळेतील कामांचे भूमीपूजन; बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांचा पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगर परिषद हद्दीतील मराठी शाळा क्रमांक एक आणि दोनच्या परिसरात अद्ययावत असे रंगमंच उभारले जाणार आहे. तसेच, शाळेच्या इमारतीवरील टेरेसवर शेडचे बांधकाम केले जाणार आहे. या कामांचे भूमीपूजन सोमवारी (दि.28) करण्यात आले. हा उपक्रम अलिबागचे बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या रंगमंचातून हक्काचे कायम स्वरुपी व्यासपीठ खुले होणार आहे.
हा भूमीपूजन सोहळा बांधकाम सभापती प्रशांत नाईक व उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ॲड. निलम हजारे, ॲड. अश्वीनी ठोसर, ॲड. ऋषिकेश माळी, ॲड. निवेदिता वाघमारे, जमाल सय्यद, योजना पाटील, कैसर दणदणे, ॲड. अंकीत बंगेरा, नगर अभियंता संतोष मुंडे, सर्व नगरसेवक, नगरपरिषद शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानंतर्गत नगरपरिषद हद्दीतील मराठी शाळा क्रमांक एक व दोनच्या परिसरात रंगमंच बांधकाम व शाळेच्या इमारतीवरील टेरेसवर शेड उभारली जाणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच वेगवेगळे उपक्रम राबवित असताना रंगमंचाद्वारे कला सादर करण्याचे हक्काचे व्यासपिठ मिळावे, यासाठी अद्ययावत असे रंगमंच बांधले जाणार आहे. अलिबाग नगरपरिषद हद्दीतील शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी होतात. या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी चांगल्या अद्ययावत रंगमंचातून मिळावी, यासाठी शाळा क्रमांक एक व दोन मध्ये रंगमंच उभारले जाणार आहे. शाळेच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या रंगमंचातून विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, वकृत्व, नृत्य नाट्य सादरीकरणासह शालेय उपक्रमांसाठी कायम स्वरुपी जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये या कामाची भर पडणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि आत्म विश्वासाला व्यासपिठ मिळावे, यासाठी शाळेच्या आावारात कायमच स्वरुपी रंगमच उभारले जाणार आहे. शाळेच्या विविध सुविधांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यासाठी अद्ययावत असे रंगमंच उभारले जाणार आहे.
प्रशांत नाईक,
बांधकाम सभापती, अलिबाग नगरपरिषद
