| महाड | प्रतिनिधी |
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे शेतीला अधिक प्राधान्य आहे. हेच धडे प्राथमिक शाळेपासूनही विद्यार्थ्यांना दिले जातात, त्याचप्रमाणे निसर्गाची किमया व शेतकऱ्यांची मेहनत याची सांगड घालून लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याकरता, रायगड जिल्हा परिषद शाळा घुरुपकोंड येथे विद्यार्थ्यांसाठी शेत शिवार अंतर्गत भात लावणी हा उपक्रम दिनांक 16 जुलै 2026 रोजी घेण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शिगवण, मुख्याध्यापिका श्रीमती. स्मिता नवघरे मॅडम व उपक्रमशिल शिक्षक श्री. ज्ञानोबा गायकवाड सर आणि सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे ग्रामस्थ उपस्थित होते. घुरुपकोंड शाळेमध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्यातीलच परिसराशी निगडित असलेला हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम शाळेमध्ये राबवल्यामुळे ग्रामस्थांना व पालकांना अतिशय आनंद झाला. सदर उपक्रमास सर्वांकडून शुभेच्छा मिळाल्या. विद्यार्थ्यांनीही भविष्यात आम्ही आनंदाने शेती करू असे वचन दिले. व भात लावणीचा आनंद घेतला.शेतमालक सौ. अनिता शिगवण यांनी सक्रिय सहभाग घेतला व विद्यार्थ्यांचे आभार मानले. शिक्षक व विद्यार्थी यांनी नांगर हाकण्याचा देखील अनुभव घेतला.







