| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जवान ऋतिक किसन ढोले (26) यांचा कर्जत-मुरबाड महामार्गावर झालेल्या एका भीषण कार अपघातात जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे श्रीवर्धन पोलीस ठाण्यासह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात बुधवारी (दि.15) रात्रीच्या सुमारास कळंब-चाहूचीवाडी परिसरात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस जवान ऋतिक ढोले हे त्यांच्या चार मित्रांसह इको कारने कळंब येथून चाहूचीवाडी येथील आपल्या घराच्या दिशेने जात होते. गाडीचे स्टेअरिंग ऋतिक यांच्याच हातात होते. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील एका अत्यंत धोकादायक वळणावर अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक रेलिंगवर प्रचंड वेगाने जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पुरता चुराडा झाला. स्थानिक ग्रामस्थ आणि कळंब पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत मोठ्या प्रयत्नाने जखमींना गाडीबाहेर काढले व भिवपुरी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच गंभीर दुखापत झाल्यामुळे ऋतिक ढोले यांचा मृत्यू झाला होता. कारमधील इतर चार मित्रही गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीवर्धनमधील शासकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचा पुढील तपास नेरळ पोलीस करत आहेत.







