विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन रस्त्यावर

कळंबोलीतील नवी मुंबई इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्यांची मैदानाची मागणी प्रलंबित

। पनवेल । प्रतिनिधी ।

देशात एकीकडे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे कळंबोली वसाहतीमधील नवी मुंबई इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्यांना मैदानाअभावी रस्त्यावरच स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागला आहे. शाळेला हक्काचे मैदान मिळावे, याकरता शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 10 येथील सिडकोच्या भूखंडावर नवी मुंबई इंग्लिश स्कुलमध्ये पहिली ते दहावी पर्यतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जवळपास 22 वर्षापासून सुरु असलेल्या या शाळेला हक्काचे मैदान नसल्याने इतर दिवसात शेजारील उद्यानाचा वापर येथील विद्यार्थी कवायती आणि खेळासाठी करतात. 15 ऑगस्ट या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने या दिवशी देशभरातील शाळांमध्ये कवायती आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. नवी मुंबई इंग्लिश स्कुलमध्ये देखील स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कवायतींच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात होत असलेल्या पावसामुळे शाळेशेजारील उद्यानात चिखल होत असल्याने कवायतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावर स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून शाळेला मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शाळेचे संस्थापक अध्यक्ष संतोष शुक्ला यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती दखल
मैदानाअभावी होत असलेली कुचंबणा दूर व्हावी, यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी 2016 साली पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. विद्यार्थ्यांच्या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने सिडकोला मैदान उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या सूचनेनंतर सिडको विभागाच्या अधिकार्‍यांनी शाळेची पाहणी करून लवकरच मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यानंतर लगेचच महापालिकेची घोषणा झाल्याने मैदानाचे प्रकरण रखडले आहे.
पालिकेशी पत्रव्यवहार
पालिकेच्या स्थापनेनंतर शाळा प्रशासनाने मैदान मिळवण्यासाठी पालिकेसोबत देखील अनेकवेळा पत्रव्यवाहर केला आहे. मात्र पालिका प्रशासनाने देखील अद्याप शाळेच्या मागणीची दखल घेतलेली नाही.
Exit mobile version