पाच्छापूर विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम; घेतला भात लागवडीचा अनुभव
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
ग्रामीण जीवन, शेतीचे महत्त्व आणि श्रमसंस्कार यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने पाच्छापूर येथील माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि.27) भात लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत उत्साहात राबविण्यात आला. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमांतर्गत पाच्छापूर गावातील प्रगतशील शेतकरी रघुनाथ जगताप यांच्या शेतामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उतरून भात रोपांची लागवड केली. यावेळी रघुनाथ जगताप यांनी विद्यार्थ्यांना भात लागवडीची योग्य पद्धत, रोपांमधील योग्य अंतररचना आणि लागवडीतील विविध तांत्रिक बारकावे यांचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतः चिखलात उतरून लागवड करण्याचा आनंद लुटला. जगताप यांनी अत्यंत संयमाने आणि आपुलकीने विद्यार्थ्यांना शेतीचे मोल समजावून सांगितले. या प्रात्यक्षिक अनुभवातून विद्यार्थ्यांना कष्टाचे मूल्य, निसर्गाशी असणारे नाते आणि अन्नधान्य निर्मितीमागे असणारे शेतकऱ्यांचे अथक परिश्रम या बाबी प्रत्यक्ष शिकायला मिळाल्या. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा अनुभव अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांना शेतात प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यालयाच्यावतीने रघुनाथ जगताप यांचे विशेष आभार मानण्यात आले. ग्रामीण संस्कृती, शेतीविषयीची आत्मीयता आणि अनुभवाधारित शिक्षण यांचा सुरेख संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींकडून विशेष कौतुक केले जात आहे.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि शेतीविषयी आदर निर्माण होण्यास मदत होते.
दिपक माळी,
मुख्याध्यापक







