। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता सुधारत असून, जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळा यांच्यात दिसत असलेली सुधारणा तालुक्याचे भविष्य असल्याचे वाटत आहे. त्यामुळे तालुक्याचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन देण्याचे टाळावेत असे, आवाहन कर्जत पंचायत संतोष दौंड समितीचे गटशिक्षण अधिकारी यांनी केले. नेरळ येथील एलएईएस शाळेच्या वार्षिक गुणगौरव तसेच नवीन वास्तू बद्दल घोषणा करण्याच्या कार्यक्रमात शिक्षण अधिकारी बोलत होते.
नेरळ येथे लॉर्ड आयाप्पा एज्युकेशन सोसायटीच्या एलएइएस इंग्लिश हायस्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन संगमचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड, अनुराधा भडसावळे, संस्थेच्या संचालिका संगीता विश्वनाथन नायर, श्रीकुमार नायर, स्मिता नायर, संध्या नायर, मुख्याध्यापिका अजिता नायर आदी तसेच जेनी ट्युलिप शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता कांदळगावकर, संचालक नितीन कांदळगावकर, ग्रामपंचायत माजी सदस्य रोहिदास मोरे, गीतांजली देशमुख, अॅड. नरेश अहिर तसेच पालक उपस्थित होते. यावर्षीपासून वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून शाळेत दहावी आणि बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. त्यामुळे हेमलता राठोड, नरेश राठोड, मुनिरा बदानी, बाकिर बदाणी आणि ललिता मसणे, नरेंद्र मसणे आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका अजिता नायर यांनी संस्थेच्या नवीन शाळेच्या इमारतीचे सादरीकरण केले.तर नायर पब्लिक स्कूलच्या सीबीएसई शाळेची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली.