रोह्याच्या नगरसेवकांचा इंदौर येथे अभ्यास दौरा

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका सद्या मध्य प्रदेशातील इंदौर येथे अभ्यास दौऱ्यावर गेले. या अभ्यास दौऱ्यातून तेथील शहरातील प्रगत कचरा व्यवस्थापन प्रणालीची सखोल पाहणी करण्यात आली.

या दौऱ्यात गोबरधन (शेण खत) बायो सीएनजी प्लँटला भेट देण्यात आली. येथे ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज सुमारे 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून जवळपास 17,000 किलो बायो सीएनजी निर्मिती केली जाते. त्यातील सुमारे 50 टक्के इंधन इंदौरमधील सार्वजनिक बस सेवेसाठी वापरले जाते. तर, उर्वरित 50 टक्के ग्रीन फ्यूल म्हणून उद्योगांना पुरवले जाते. त्यानंतर नगरसेवक मंडळींनी येथील सुक्या कचऱ्यासाठी असलेल्या मटेरियल रीकव्हर फॅसिलिटी या सेंटरला भेट दिली. येथे कचऱ्याचे 18-20 प्रकारांमध्ये वर्गीकरण कसे केले जाते व त्यानंतर त्यावर प्रक्रिया कशी केली जाते याबाबत सविस्तर माहिती व मारगदर्शन करण्यात आले. शेवटी कन्स्ट्रक्शन अँड डीमोलिशन वेस्ट प्रोसेसिंग प्लँटची पाहणी करण्यात आली. येथे बांधकामातील कचरा प्रक्रिया करून त्याचे 10 एमएम, 20 एमएम अग्रेगेट्स वाळू, तसेच पेव्हर ब्लॉक्स तयार करण्यासाठी कसा उपयोग केला जातो, याची सविस्तर माहिती देण्यात आली.

Exit mobile version