जेएनपीएत अभ्यास दौर्‍याचे आयोजन

। अलिबाग । वार्ताहर ।

जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्यावतीने रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनच्या छायाचित्रकारांसाठी जेएनपीएच्या परिसरातील छायाचित्रीकरणासाठी अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. एक छायाचित्र खूप काही सांगून जाते. छायाचित्रामधून अनेक गोष्टींचा उलघडा होण्यास मदत होते. असे उद्गार जेएनपीएचे वाहतूक शाखेचे जनरल मॅनेजर गिरीश थॉमस यांनी या दौर्‍यात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमावेळी काढले.

भारतातील अव्वल असलेल्या उरण तालुक्यातील नाव्हा शेवा येथील निसर्गाने नटलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट परीरातील सौंदर्य कॅमेर्‍यात टिपण्यासाठी या अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात भारतात नावाजलेल्या अशा या पोर्टवर जगभरातून येणार्‍या व्हेसल्स मधून येणारे कंटेनर क्रेनच्या साहाय्याने कसे उतरवले जातात, अशा प्रकारच्या अनेक कामांचे छायाचित्र काढण्याची संधी या दौर्‍याच्या निमित्ताने रायगडमधील छायाचित्रकारांना मिळाली. तर, दुसर्‍या सत्रात पोर्ट प्रशासकीय इमारतीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना फोटोग्राफर्स असोसिएशनचे सदस्य सुशील घाटवल आणि सहसचिव दीपक बडगुजर यांनी मोबाईल फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद निंबरे, खजिनदार जितेंद्र मेहता, कार्यकारिणी सदस्य अविनाश राऊत, प्रीतम सकपाळ, मनोज पाटील, तुषार थळे, योगेश कुंभार, समाधान पाटील, रुपेश महाडिक, योगेश बोराणा, चेतन केळकर, चैतन्य पाटील यांच्यासह असोसिएशनचे 16 सदस्य या अभ्यास दौर्‍यात सहभागी झाले होते.

Exit mobile version