| अलिबाग | वार्ताहर |
जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून उरण येथील जवाहर लाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्यावतीने रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनच्या छायाचित्रकारांसाठी जेएनपीएच्या परिसरातील छायाचित्रीकरणासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. एक छायाचित्र खूप काही सांगून जाते. छायाचित्रामधून अनेक गोष्टींचा उलघडा होण्यास मदत होते. असे उदगार जेएनपीएचे वाहतूक शाखेचे जनरल मॅनेजर गिरीश थॉमस यांनी या दौऱ्यात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमावेळी काढले. वरिष्ठ मार्केटिंग मॅनेजर आंबिका सिंघ, मार्केटिंग – ट्राफिकचे डेप्युटी मॅनेजर एम. डी. डोंगरे, मार्केटिंग एक्सिकूटिव्ह वर्षा मेहता, संदीप पाटील यांनी या अभ्यास दौऱ्याचे उत्तम नियोजन केले होते.
भारतातील अव्वल असलेल्या उरण तालुक्यातील नाव्हा शेवा येथील निसर्गाने नटलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट परिसरातील सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर पोर्टच्या प्रशासकीय विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन देखील ठेवण्यात आले होते, पहिल्या सत्रात भारतात नावाजलेल्या अशा या पोर्ट वर जगभरातून येणाऱ्या व्हेसल्स मधून येणारे कंटेनर क्रेनच्या साहाय्याने कसे उतरवले जातात अशा प्रकारच्या अनेक कामांचे छायाचित्र काढण्याची संधी या दौऱ्याच्या निमित्ताने रायगडमधील छायाचित्रकारांना मिळाली. तर दुसऱ्या सत्रात पोर्ट प्रशासकीय इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोटोग्राफर्स असोसिएशनचे सदस्य सुशील घाटवल आणि सहसचिव दीपक बडगुजर यांनी मोबाईल फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन केले.
या वेळी रायगड फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे , सचिव आनंद निंबरे, खजिनदार जितेंद्र मेहता, कार्यकारिणी सदस्य अविनाश राऊत, प्रीतम सकपाळ, मनोज पाटील, तुषार थळे, योगेश कुंभार, समाधान पाटील, रुपेश महाडिक, योगेश बोराणा, चेतन केळकर, चैतन्य पाटील यांच्यासह असोसिएशन चे 16 सदस्य या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.