। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गाबाबतचा पाहणी अहवाल न्यायालयाने नेमणूक केलेल्या कोर्ट कमिशनने सादर केला आहे. आपल्या अहवालात महामार्गावरील रस्ता सुस्थितीत नाही. ड्रॉईंग आणि नकाशानुसार बनविलेला नाही त्यामुळे हा रस्ता मानवी वापरास निकृष्ट असून रस्त्याचे कामकाज दर्जेदार व गुणवत्तापूर्ण नाही असा निष्कर्ष कोर्ट कमिशनरने न्यायालयाकडे नोंदविले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याबाबत कोर्ट कमिशनरने पाहणी करून निष्कर्ष अहवाल अलिबाग न्यायालयात सादर केला आहे. अहवालात महामार्गाच्या निकृष्ट कामासोबत ठेकेदार, नॅशनल हायवे अधिकारी यांच्यावरही अहवालात ताशेरे ओढलेले आहेत. याबाबत आमचे म्हणणे न्यायालयात सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई गोवा महामार्गाच्या एनएचएआय 66 व अन्य रस्त्याची वस्तुस्थितीबाबत 2016 रोजी अलिबाग न्यायालयात याचिका दाखल केली होती. सद्य परिस्थितीसमोर येण्यासाठी कोर्ट कमिशनरची नेमणूक करण्याचा अर्जही दाखल करण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाने कोर्ट कमिशनर म्हणून पी एन पाडळीकर यांची नेमणूक केली होती. कोर्ट कमिशनर, याचिककर्ता, प्रतिवादी यांनी 1 आणि 2 फेब्रुवारी 2022 रोजी दोन दिवस महामार्ग पाहणी केली. त्यानंतर महिनाभरानंतर कोर्ट कमिशनर यांनी आपला निष्कर्ष अहवाल न्यायालयात सादर केला आहे.