| पोलादपूर | शैलेश पालकर |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गणेशभक्तांची वाहतूक एकमार्गी करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू असताना ती वाहतूक कितपत सुखकर होईल याबाबत साशंकता आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगाव ग्रामपंचायत हद्दीतील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाच्या युध्दपातळीवरील कामाला ग्रामपंचायतीच्या थकीतकराचे कारण पुढे करून बुधवारी दिवसभर टाळे लावण्यात आले. शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या पोट ठेकेदारांनी हा कर अर्धाअधिक जमा केल्यानंतर रात्री उशिरा कार्यालयाचे टाळे काढण्यात आले. बुधवारीच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तळगांव येथून पोलादपूर तालुक्यातील कातळी गावातील भुयारी मार्गापर्यंत पाहणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येत्या सोमवार 10 सप्टेंबर 2023 पासून भुयारी मार्गातून हलक्या वजनांच्या वाहनांसाठी एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने भुयारी मार्गाची पाहणी केली असता हा एकमार्गी वाहतुकीचा भुयारातील प्रवास अपघातप्रवण क्षेत्र होण्याची शक्यता दर्शवित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कमी वजनाच्या वाहनांची वाहतुक कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून सोमवार 10 सप्टेंबरपासून सुरू करण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी दिल्यानंतर कातळी भोगावच्या भुयारी मार्गातील काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यास सुरूवात झाली. दरम्यान, भुयारी मार्गापर्यंत जाणाऱ्या महामार्गावरील तीन पुलांचे काम अपूर्ण असताना त्याठिकाणांना वळसा घालून पर्यायी एकमार्गी वाहतूकीसाठी रस्ते तयार करण्यात येत आहेत. पहिल्या पावसातच या रस्त्यांना भेगा पडल्याने याठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत हे काम मजबुत वाटत असले तरीही ज्यापध्दतीने भरावाला भेगा पडताना दिसून आले होते ते पाहता या रस्त्याखालील भराव मजबूत नसल्याने काँक्रीटीकरणाचेही तुकडे-तुकडे होण्याची शक्यता आहे. कातळी भोगाव येथील दोन भुयारी मार्गांपैकी मुंबईकडे जाण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या भुयारी मार्गामध्ये तातडीने एकमार्गी वाहतूकीसाठी काँक्रीटचा रस्ता बांधण्यात आला आहे.
मात्र, या रस्त्याचा गणशोत्सव काळामध्ये कोकणात जाण्यासाठी वापर होणार असून येथे 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पध्दतीने भुयारी मार्गाचे खोदकाम झाल्यानंतर सिलींगचे अर्धवर्तुळाकार पिचिंग आणि कडेच्या भुयारापर्यंत जाण्यासाठीच्या अंतर्गत मकनेक्टीव्हिटीचा रस्त्यासह कोकणात जाताना 20 मीटर रुंदीपैकी डाव्या बाजूकडील अर्धा काँक्रीटचा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही. परिणामी, एकमार्गी वाहतूकीसाठी तयार केलेल्या रस्त्यावरून हलक्या वजनाची छोटी वाहने काँक्रीटीकरणाचा रस्ता न केलेल्या डाव्या बाजूला घसरल्यास अपघाताची शक्यता असून या अपघातांनंतर अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्घ नसल्याने भुयारी मार्गामध्ये वाहतुकीची कोंडी होऊन गणेशभक्तांच्या प्रवासात विघ्न निर्माण होण्याची परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे कशेडी घाटाला पर्याय असे भुयारी मार्गाचे स्वरूप न ठेवता ज्यांना कशेडी घाटातून जायचे नसेल अशांना भुयारी मार्ग उपलब्ध करून देण्यात येण्याची गरज आहे. म्हणजेच कशेडी घाटासह कातळीभोगावचे भुयारदेखील वाहतुकीस उपलब्ध करण्याची गरज आहे.
भोगाव खुर्द ग्रा.पं.कडून थकीत करासाठी लावलेले टाळे काढले. पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या 26 लाख रूपयांपेक्षा अधिकच्या कराची थकबाकी आहे . शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या पोट ठेकेदारांनी करापोटी रक्कमेचा भरणा करण्यासंदर्भात अक्षम्य दूर्लक्ष केले. या पोट ठेकेदाराच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तहसिलदार कपिल घोरपडे यांच्याकडे माहिती मागितली असता रात्री उशिरा एसडीपीएल या पोट ठेकेदार कंपनीकडून करापोटी थकित रकमेपैकी अर्धी रक्कम भरणा करून उर्वरित रक्कमेसाठी काही कालावधी मागण्ण्यात आल्याने कंपनीच्या कार्यालयाला लावलेले टाळे बुधवारी रात्री काढण्यात आल्याचे सांगितले.