खैराची तस्करी रोखण्यात यश

। पालघर । प्रतिनिधी ।

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेन ग्रामपंचायत जवळील रस्त्यावर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी संशयित टेम्पोचा पाठलाग करून त्या टेम्पोला अडविण्यात आले. या टेम्पोचा चालक फरार झाला असून टेम्पोमध्ये तीन टन वजनाचे खैराचे सोलीव ओंडके आढळून आले आहे. यावेळी टेम्पोसह खैराचे ओंडके जप्त करण्यात आले आहेत. तसेच, खैराच्या झाडांची कत्तल आणि तस्करी प्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोर वन परिक्षेत्रातून मौल्यवान खैराच्या झाडांची कत्तल आणि तस्करी रोखण्यासाठी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री मनोर विक्रमगड रस्त्यावरून खैराच्या ओंडक्यांची तस्करी होणार असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचार्‍यांना मिळाल्याने कारवाईसाठी जागरूक ग्रामस्थांची मदत घेत मनोर- विक्रमगड रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास महामार्गावरील जव्हार फाटा येथून एक टेम्पो भरधाव वेगात जात असल्याचे दिसताच वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी दोन वाहनांच्या मदतीने संशयीत टेम्पोचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असल्याचे कळताच चालकाने पकडले जाण्याच्या भीतीने निर्जन रस्त्यावर टेम्पो उभा करून अंधाराचा फायदा घेत पळून गेला. वनविभागाचे कर्मचारी टेम्पो जवळ पोहोचल्या नंतर टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये खैराच्या झाडांचे तीन टन वजनाचे सोलीव ओंडके आढळून आले.

ही कारवाई मनोर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल वैभव सातपुते यांच्या मार्गदर्शनात वनपाल समाधान पाटील, वनरक्षक तेजस सुतार, शैलेश गांगोडा, साईनाथ कुवर, कांचन वळवी आणि वैभव जगदाळे यांच्या पथकाने केली. सावरखंड गावातील समाजसेवक महेंद्र गोवारी यांच्यासह संदीप पाडेकर, रामदास पाडेकर आणि विश्राम पाडेकर यांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना कारवाई दरम्यान मदत केली.

Exit mobile version