बदनामीपोटी रेल्वेखाली झोकून दिले
। पालघर । प्रतिनिधी ।
वसईतील मेहता पिता-पुत्राने 7 जुलै रोजी भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेखाली झोपून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. सिसिटीव्हीत दोघे स्थानकात उतरून चालत जाताना आणि अगदी सहज ट्रेनखाली झोपल्याचे दिसत असल्याची चित्रफित सर्वत्र पसरली होती. त्यांनी आत्महत्या का केली याचे गूढ होते. अखेर चौकशीनंतर या प्रकरणात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. जय मेहता याने अन्य धर्मीय मुलीशी लग्न केले होते. ते प्रकरण उघडकीस आल्याने समाजात बदनामी होईल या भीतीपोटी दोघांनी आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. जय मेहताची दोन लग्न झालेली असून त्याचा मोबाईल फोन आणि कार्यालयात सापडलेली डायरी तसेच त्याच्या दोन्ही पत्नींच्या जबानीतून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
जय मेहता (30) हे वडील हरिष मेहता (60) यांच्यासह वसईतील वसंत नगरी येथील रश्मी दिव्य हाऊस संकुलात राहत होते. जयचा काही महिन्यांपूर्वी एका दाक्षिणात्य मुलीशी प्रेमविवाह झाला होता. तसेच, जयचे एका अन्यधर्मीय तरुणीशी 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या दोघांनी प्रतिज्ञापत्राद्वारे लग्नही केले होते. परंतु, आपला समाज या तरुणीला स्वीकारणार नाही म्हणून त्याने तिला अंधारात ठेवत दाक्षिणात्य मुलीशी प्रेमविवाह केला होता. जयच्या पहिल्या पत्नीला ही बाब समजल्यानंतर तिने याबाबत जाब विचारला आणि दुसर्या दाक्षिणात्य पत्नीला सोडण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली होती. दरम्यान, दुसर्या पत्नीलाही जयचे प्रेमप्रकरण समजल्याने त्यांच्यातही वाद सुरू झाले होते. हे प्रकरण समाजात समजल्यावर बदनामीला सामोरे जावे लागेल, अशी मेहता पिता पुत्रांना भीती होती. यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असल्याची माहिती वसई रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
जय मेहताच्या मरोळ येथील कार्यालयात त्याची एक डायरी सापडली होती. यात डायरीत त्याने दोन्ही पत्नींना उद्देशून एक पत्र लिहिले होते. यात त्याने दोघींची माफी मागितली होती. या डायरीद्वारे तसेच जयच्या मोबाईलमधील कॉल्सचे तपशील गोळा करून पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला. यावेळी वसई पोलिसांकडून सांगण्यात आले की, आम्ही दोन्ही पत्नींचे जबाब नोंदविले आहेत. मात्र, कुणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.