विवाहितेची आत्महत्या की हत्या?

पतीसह अन्य तिघांवर गुन्हा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील रजपे गावातील अंगणवाडी सेविका अश्विनी संतोष घुडे (27) यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, अश्विनीची आत्महत्या ही हत्या असल्याचा दावा तिच्या माहेरच्यांनी केली आहे. दरम्यान, संशयित आरोपी पतीसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुरबाड तालुक्यातील विडे गावातील अश्विनी यांचा 2018 साली विवाह झाला असून, तिला पाच आणि तीन वर्षांची दोन मुले आहेत. मयत अश्विनी रजपे येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहात होती. सासरी छळ होत असून, तिला ठार मारू शकतात, अशी कल्पना तिने याआधीच माहेरी दिली असल्याची माहिती भाऊ देवेश मंगल शिंगळे यांनी दिली आहे. अश्विनी शनिवारी सकाळी झाडाला स्वतःच्याच साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ही बातमी समजताच तिच्या माहेरच्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत सासरी होत असलेला छळ यातून मारहाण करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे तिने माहेरी कळविले असल्याने तिची आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगितले. सातत्याने मारहाण होत असल्याने आणि त्याच मारहाणीमधून अश्विनीचा मृत्यू झाला असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात पोलीस ठाण्यात आरोपी पती संतोष घुडे आणि आणखी तिघांविरोधत गुन्हा दाखल झालेला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत.

Exit mobile version