| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान मध्ये ऐन सुट्ट्यांच्या हंगामात वाढत्या उष्णतेमुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असून, उष्णतेचे तापमान 38 अंश इतके झाल्याने बहुतांश हॉटेल मधील आरक्षणे रद्द झाल्याने इथल्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होताना दिसून येत आहे. पूर्वीचे आणि आताचे माथेरान ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे.
गर्द झाडी ही माथेरानची खरी ओळख हळूहळू संपुष्टात येताना दिसत आहे. गर्द वनराईमुळे हवेत गारवा होता तो आता लोप पावत चालला आहे, त्याची कारणे स्थानिकांना ठाऊक आहेत. दस्तुरी पासून रेल्वे स्टेशन पर्यंत जी रस्त्यालगत मोठमोठी जुनी झाडे आहेत ती का सुकत चालली आहेत याकडे वनखात्याने, संयुक्त वन व्यवस्थापन समितीने लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनले आहे. दरवर्षी हीच सुकलेली झाडे आणि जंगलातील झाडे अतिवृष्टीमध्ये मुळासहित उन्मळून पडत आहेत. ही झाडीच जर का भविष्यात पूर्णपणे लोप पावली तर याठिकाणी पर्यटक येणार नाहीत हे सत्य आहे. केवळ पर्यटन शेतीवर इथल्या सर्वसामान्य लोकांसह, मोलमजुरी करणारे कष्टकरी, हमाल, रिक्षा, घोडा व्यावसायिक, लॉज, हॉटेल धारकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होत असते. मागील काही दिवसांपासून पूर्णपणे मंदीचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. त्यातच हवेतील उष्मा वाढत असून, जवळपास 38 पेक्षाही अधिक उष्म तापमान अनुभवायास मिळत आहे. तुरळक पर्यटक दिसत असून बाजारपेठ मध्ये शुकशुकाट दिसत आहे. माथेरानचे पर्यटन वाचविण्यासाठी आता होतकरू युवकांनी पुढाकार घेऊन परिसरात शेकडो रोपांची लागवड करून ही रोपे जगली पाहिजेत यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रशासना मार्फत दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण दिखावा करून लाखो रुपयांची बिले काढली जातात. एकदा का वृक्षारोपण केले की नंतर त्याकडे लक्ष देण्यास कोणत्याही खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळ नसतो. सध्याची परिस्थिती पाहता माथेरान हे हिल स्टेशन आहे की हॉट स्टेशन आहे असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
माथेरान सारख्या ठिकाणी एवढी उष्णता आम्ही पहिल्यांदा अनुभवली. सकाळी अकरा वाजल्यापासून उन्हाच्या उष्ण झळा सुरू झाल्यामुळे आम्ही बाहेर फिरायला जाणे टाळून हॉटेलच्या रूममध्ये आराम करणे पसंत केले. पूर्वी इथे पंखे लावण्याची आवश्यकता भासत नव्हती परंतु पावसाळ्यात सुध्दा पंखे लावावे लागतात. लोकल पब्लिकने झाडांचे आपल्या मुलांप्रमाणे संगोपन, जतन केल्यास इथे पूर्वीसारखी थंड हवा अनुभवायला मिळेल.
अनुप मढवी
पर्यटक सानपाडा, मुंबई
