मुरूडमध्ये उन्हाचा तडाखा; जनजीवनावर परिणाम

दुपारी कडक उन्हामुळे चटके; सायंकाळी तीव्रता कमी

| मुरूड जंजिरा । वार्ताहर ।

सामान्यपणे दरवर्षी होळी नंतर हवेत उष्णता वाढत असते; परंतु यंदा मुरूडमध्ये फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उष्णतेच्या झळा वाढत्या आहेत. कडक उन्हामुळे सकाळी, दुपारी बाजारहाट करण्यासाठी येणारे नागरिक मात्र घामाघूम होताना दिसत आहेत. उन्हाचे मोठे चटके बसत असून ज्येष्ठ नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास होताना दिसून येत आहे. ही उष्णता वेगळीच असल्याचे बुजुर्ग सांगत आहेत. लहान मुलांनादेखील याचा अधिक त्रास होऊ शकतो.

अति उष्णता निर्माण झाल्यास अनेक व्याधी निर्माण होत असतात. सध्या मुरूडचे दुपारी तापमान 32 ते 33 सेल्सियस पर्यंत वाढत असून, सायंकाळी मात्र तापमान 27 सेल्सियस पर्यंत खाली येत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत उष्णता जाणवत नाही. मात्र दुपारपर्यंत उष्णतेचा परिणाम जाणवत आहे. कडक उन्हामुळे शेतीतून घेतल्या जाणार्‍या पूरक पिकांवर देखील परिणाम होत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे झाडे, फुले भाज्या यावर देखील होत आहे. मुरूडपासून पाच किमी अंतरावर असलेल्या खारआंबोली, शिघ्रे, जोसरांजन, वाणदे, आंबोली, उंडरगाव, नागशेत, तेलवडे येथील महिला विविध प्रकारच्या हिरव्यागार भाज्या मुरूड बाजारामध्ये विक्रीस घेऊन येत असतात. उष्णता असल्याने या भाज्या वेळेत विक्री न झाल्यास कोमेजून जात आहेत.

वाढत्या उष्णतेमुळे बर्फ गोळा, लिंबू सरबत, शहाळी, आणि थंड पदार्थांची मागणी वाढल्याचे दिसून येते. समुद्रकिनारी भागात देखील उन्हाच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. पर्यटकांची संख्या देखील रोडावली आहे. दुचाकीवरून जाताना रस्त्यावरील उष्णतेच्या झळा तोंडावर असल्याने चालक हवालदिल झाल्याचे दिसत आहेत.

Exit mobile version