सुनील छेत्रीचा अखेरचा सामना

भारताचा 27 खेळाडूंचा संघ जाहीर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

सुनील छेत्रीचा अखेरचा सामना असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता लढतीसाठी भारताचा 27 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला. आघाडी फळीतील प्रतिभ गोगई आणि बचावपटू मुहम्मद हमद यांना दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. कुवेतविरुद्धचा हा सामना 6 जून रोजी होणार आहे. भुवनेश्‍वर येथील सराव शिबिरात एकूण 32 खेळाडू होते. त्यातील फुरबा लचेनपा, पार्थिब, इम्रान खान, हम्माद आणि जिथिन एमएस यांना रिलीझ करण्यात आले. प्रतिभ आणि हमद यांना हलक्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत, तरी त्यांना 7 ते 14 दिवसांची विश्रांती आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला नसल्याचे मुख्य प्रशिक्षक स्टिमॅक यांनी सांगितले. निवडण्यात आलेले 27 खेळाडू 29 मे पर्यंत भुवनेश्‍वर येथेच सराव करतील आणि त्यानंतर ते कोलकताला प्रयाण करतील.
कुवेतविरुद्धचा हा सामना झाल्यानंतर भारताचा संघ कतारला जाणार आहे. तेथे ‘अ’ गटातील अखेरचे दोन साखळी सामने होणार आहेत. भारतीय संघ ‘अ’ गटात चार सामन्यांतून चार गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ पात्रता फेरीच्या राऊंड-3 साठी पात्र ठरतील. कुवेतविरुद्धच्या या सामन्यातून सुनील छेत्री आपल्या देदीप्यमान कारकिर्दीची सांगता करणार आहे. हा त्याचा 151 वा सामना असेल. यात त्याने आतापर्यंत 94 गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणार्‍या ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांच्यानंतर छेत्री चौथ्या क्रमांकाचा फुटबॉलपटू आहे.

27 खेळाडूंचा संघ :
गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, विशाल कैथ. बचावपटू : अमेय रानवडे, अन्वर अली, जय गुप्ता, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, नरेंद्र, निखिल पुजारी, राहुल भेके, सुभाषीश बोस. मधली फळी : अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, एडमंड लालरिंदिका, जेक्सन सिंग थौनाओजम, ललियानझुआला छांगटे, लिस्टन कोलाको, महेश सिंग नौरेम, नंदकुमार सेकर, सहल अब्दुल समद, सुरेश सिंग वांगजाम. आघाडी फळी : डेव्हिड लालहलांसंगा, मनवीर सिंग, रहीम अली, सुनील छेत्री, विक्रम प्रताप सिंग.
Exit mobile version