ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे प्रतिपादन; दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशित
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अंधश्रध्दांचा उपयोग हा राजकारणासाठी केला जात आहे. सर्व काही सुसूत्रपद्धतीने सुरू आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अंधश्रद्धांचे काय करायचे हा मोठा प्रश्न आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका – ऑगस्ट 2021 या मासिकाच्या शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात हेमंत देसाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, प्रमुख पाहुणे अविनाश पाटील होते. यावेळी मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड, प्रमोद गंगणमाले, राजेंद्र फेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. श्यामसुंदर मिरजकर यांनी सुत्रसंचलन केले, तर डॉ. ठकसेन गोराणे यांनी आभार मानले. तांत्रिक व्यवस्था अवधूत कांबळे यांनी पाहिली.
सम तारखेला संग केल्यास कोणते अर्भक जन्माला येते असे म्हणनाऱ्या बाबाला राजकीय लोक समर्थन देतात. कोरोनाच्या काळात टाळ्या वाजवायला सांगून त्यातून निर्माण झालेल्या अंधश्रध्दांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत. काही राजकीय लोक गोमूत्राने कोरोना बरा होतो अशी वक्तव्ये करतात. काही देवस्थाने नवसाला पावणारा देव म्हणून जाहिरात करतात आणि प्रसारमाध्यमे देखील त्याला प्रसिद्धी देतात. पण याकडे गंभीरपणे पाहिले जात नाही, अशी खंत हेमंत देसाई यांनी यांनी व्यक्त केली.
अंधश्रद्धा निर्मूलनाची लढाई सध्याच्या काळात अवघड बनली आहे. अनेक राज्यातील सत्ताधारी अंधश्रद्धांना पाठबळ देत आहेत, असे डॉ. सुरेश खुरसाळे यांनी सांगितले. महाराष्ट्र अंनिसच्या कामाबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देवाधर्माशी संबंधित असलेल्या अंधश्रध्दांसह राजकीय क्षेत्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करावे लागणार आहे, अशी अपेक्षा अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.