SSC HSC Supplementary Exam: उद्यापासून दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा

| रायगड | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलैमध्ये पुरवणी परिक्षा घेण्यात येते. यंदा घेण्यात येणारी इ. दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवार दि.16 जूनपासून सुरू होत आहे. यावेळी रायगड जिल्ह्यातून इ.10च्या परीक्षेसाठी एकूण 912, तर 12वी पुरवणी परीक्षेसाठी 1458 विद्यार्थी प्रविष्ठ आहेत.

फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये इ. दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या मुख्य परीक्षेत एका किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक वर्ष न वाया घालवता उत्तीर्ण होण्याची संधी पुरवणी परीक्षा देते. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य मंडळाद्वारे दरवर्षी जून-जुलै महिन्यात घेतली जाते. त्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होऊन विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतात. त्यानुसार बारावी व दहावीची परीक्षा दि.16 जूनपासून सुरू होत आहे. दहावीची पुरवणी परीक्षा दि.16 ते 30 जूनदरम्यान, तर बारावीची पुरवणी परीक्षा दि.16 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पुरवणी परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 912, तर बारावीच्या पेपरसाठी 1458 विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. यावेळी दहावी व बारावीची परीक्षा 10 केंद्रांवर होणार आहे. परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात होण्यासाठी, तसेच केंद्रावर घडणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध घालता यावा म्हणून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षांसाठी 163 कलम लागू
जिल्ह्यातील परीक्षा वितरण केंद्रे व परीक्षा केंद्रांवर मोबाईल फोन, पेजर यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरातील एसटीडी बूथ, झेरॉक्स मशीन व फॅक्स मशीन बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षेसाठी आवश्यक साहित्याव्यतिरिक्त इतर कोणतेही आक्षेपार्ह साहित्य वापरण्यासही बंदी राहणार आहे. याशिवाय प्रत्येक पेपर सुरू होण्याच्या एक तास आधीपासून ते पेपर संपल्यानंतर एक तासापर्यंत परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश अथवा वावर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Exit mobile version