। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शिवसेना भवन कुणाचे? ठाकरे गटाच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. ठाकरे गटाची संपत्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याबाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती.
शिवसेना भवनासह पक्षाचा निधी आणि शिवसेना शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. एका वकिलाने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेशी शिंदे गटाचा काहीही संबंध नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच याचिका करणार्या वकिलालाही सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत उद्धव ठाकरे गटाकडे असलेलं शिवसेना भवन, शिवसेनेचा निधी आणि शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाकडे देण्याची मागणी केली होती. गिरी यांच्या या याचिकेने सर्वांची झोप उडाली होती. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतल्यानंतर कोर्ट त्यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळूनच लावली नाही तर या वकिलाला खडेबोलही सुनावले आहेत.