| बारामती | प्रतिनिधी |
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी विद्यमान खासदार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार 18 एप्रिल रोजी पुण्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिल आहे. बारामतीतील प्रमुख लढत सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार अशीच होईल हे स्पष्ट झाले आहे. अजून इतर कोण उमेदवार अर्ज दाखल करतात या वरही मतांची किती विभागणी होणार हेही ठरणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच सहा विधानसभा मतदारसंघात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. प्रचंड उन्हात कार्यकर्त्यांना प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे दुपारी प्रचार देखील थंडावत आहे. पूर्ण निवडणूकच भर उन्हात होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांपुढे या कडक उन्हाचे आव्हान उभे ठाकले आहे.
दरम्यान 18 एप्रिल रोजी दोन्ही बाजूंकडून मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. महायुतीकडून बारामतीसोबतच पुणे व शिरुर मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व शिवाजीराव आढळराव पाटील हेही अर्ज दाखल करणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रसंगी उपस्थित राहणार असून तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यात जाहीर सभाही होणार आहे. बारामती मतदारसंघात आता हळुहळू निवडणूकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. प्रचारसभा, कोपरासभा, प्रत्यक्ष गाठीभेटी, संवाद, कार्यक्रमांना उपस्थिती, पत्रकवाटप, रॅली, पदयात्रा या माध्यमातून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराला वेग देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
सुप्रिया, सुनेत्रा 18 एप्रिलला दाखल करणार अर्ज
