भोलेनाथ धाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळ विक्री
| पनवेल | प्रतिनिधी |
इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने अनेक वाहनचालक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. खालापूर तालुक्यातील भोलेनाथ ढाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळदेखील अशा पर्यायी आणि स्वस्त इंधनाची विक्री बेकायदेशिरपणे होत आहे, अशी चर्चा आहे. खालापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून कोणत्याही कारवाईचा बडगा उचलला जात नसल्यामुळे बेकायदेशीर डिझेल विक्री करणार्यांचे चांगलेच फावले आहे. यामध्ये पोलीस प्रशासन असो किंवा मग तहसील विभागाचे पुरवठा अधिकारी कारवाई करण्यासाठी मागे का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
सामान्य डिझेलच्या किमतीत आणि बायो डिझेलच्या किमतीतील तफावत अशा पद्धतीने व्यवसाय तेजीत आणत आहेत. डिझेल पंप चालकांना त्यामागे कर स्वरूपात शासनाला महसूल द्यावा लागतो, मात्र बायो डिझेल विक्री करणारे मोकाट रस्त्यांवर या डिझेलची विक्री करीत आहेत. राज्यात बायो डिझेल विक्रीवर प्रतिबंध असतानाही अनेक ठिकाणी बायो डिझेलची विक्री जोर धरत आहे. अशातच गेली अनेक वर्षे खालापूर तालुक्यात या डिझेलच्या विक्रीने उच्छाद मांडला आहे. चौक फाटा ते खालापूर या रस्त्यावर भोलेनाथ धाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळच्या मागील बाजूस लाखो लीटर बायो डिझेलची दिवसभर साठवणूक करून रात्रीच्या अंधारात विक्री करण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच काही ठिकाणी टँकरमधून ऑईल चोरीदेखील केली जात आहे. याठिकाणी पोलिसांची गस्त असते, मात्र रात्रीच्या सुमारास मोठमोठे कंटेनर या धाब्याच्या मागे का जात असावे किंवा मग टँकर या बियर शॉपीच्या मागे का जात असावे? हे त्यांना दिसत नसावे का? तसेच तहसील कार्यालयाच्या पुरवठा अधिकार्यांचे त्यांच्या परिसरात लक्ष नाही का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत.