डिव्हिलियर्सने दिला सल्ला
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मी सूर्यकुमारचा खूप मोठा चाहता आहे. तो मी जसा खेळायचो तसाच खेळतो. मात्र, एकदिवसीय सामन्यात त्याला अद्याप अशी फलंदाजी करता आलेली नाही. त्याच्या मनातील एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटबद्दलची जी मानसिकता आहे, त्याच्यात परिवर्तन घडवून आणण्याची सध्या गरज आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज डिव्हिलियर्सने व्यक्त केले आहे. सूर्यामध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे, परंतु, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना खूप काम करुन घ्यावे, लागेल, असेही तो म्हणाला.
डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, सूर्यकुमारला विश्वचषक संघात पाहणे ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. टीम इंडियाला सामना फिरवून देणारा खेळाडू मिळाला आहे. मला आशा आहे की, या विश्वचषकात त्याला प्लेईंग 11मध्ये संधी मिळेल. संजू सॅमसनला विश्वचषक संघात स्थान मिळू न शकल्याबद्दल डिव्हिलियर्सने सूचक विधान केले. तो म्हणाला, मला त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही. तो काय करण्यास सक्षम आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच्याकडे फलंदाजी आणि यष्टीरक्षक म्हणून सर्व प्रकारचे कौशल्य आहे. फक्त मी आधी सूर्याबद्दल सांगितले तेच, हे सर्व मनात घडते. प्रत्येक खेळाडूने आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तो एकदिवसीय सामन्यातील खेळाचे नियोजन, विश्वचषक आणि दबावाशी जुळवून कसा घेतो, हा खूप मोठा विषय आहे.
तो पुढे म्हणाला, भारतीय संघ खूप मजबूत दिसत आहे. टीम इंडियाच्या बाबतीत माझ्या मनात एकच चिंता आहे ती म्हणजे, स्वतःच्या भूमीवर खेळणे आणि विजेतेपद पटकावणे. याआधी त्यांनी भारतात खेळून जेतेपद पटकावले आहे पण, त्यांच्यावर खूप दबाव असेल. ते याला सामोरे जाऊ शकतात, मला त्यात काही अडचण दिसत नाही. आपण जे काही नियंत्रित करू शकता, ते सर्व करा आणि धैर्याने खेळा. भारतीय संघ घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर खूप दडपण असेल. रोहित शर्मा अँड कंपनीसाठी डिव्हिलियर्सने मंत्र दिला आहे की, निर्भयपणे खेळा आणि 2011च्या यशाची पुनरावृत्ती करा, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा!