सूर्यकुमारचे झंझावाती शतक, कुलदीपचे पाच बळी

यादवी खेळीने यजमान ढेर; दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी धुव्वा , टी-20 मालिकेत साधली बरोबरी

| जोहान्सबर्ग | वृत्तसंस्था |

कर्णधार सूर्यकुमार यादवचे झंझावाती विक्रमी शतक (100 धावा) आणि कुलदीप यादवच्या फिरकीने (5-17) यजमान दक्षिण आफ्रिकेची दैना उडाली. दोन्ही यादवांच्या सांघिक खेळीने भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांना सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या महत्त्वपूर्ण 60 धावा आणि रवींद्र जडेजा (2/25) यांच्यासह इतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अखेरच्या टी-20 लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेवर 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासहतीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

भारताकडून दक्षिण आफ्रिकन संघासमोर 202 धावांचे आव्हान उभे ठाकले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकन संघातील फलंदाजांचा निभाव लागला नाही. मुकेशकुमारने मॅथ्यू ब्रिटझ्केला चार धावांवर बाद केले. त्यानंतर रिझा हेंड्रिक्स आठ धावांवर धावचीत झाला. कर्णधार एडन मार्करम व हेनरिक क्लासेन ही जोडी डाव सावरणार असे वाटत असतानाच अर्शदीप सिंगने क्लासेनला (5 धावा) व रवींद्र जडेजाने मार्करमला (25 धावा) तंबूत पाठवत भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली.

दक्षिण आफ्रिकन संघाची अवस्था 4 बाद 42 धावा अशी झाली. त्यानंतर डेव्हिड मिलर याने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण, कुलदीप यादव भारतासाठी धावून आला. त्याने मिलर (35 धावा), डोनोवन फेरेरा (12 धावा), केशव महाराज (1 धाव) व नांद्रे बर्गर (1 धाव), लिझाड विल्यम्स (0) यांना बाद करीत भारताचा विजय निश्चित केला. कुलदीपने 17 धावा देत निम्मा संघ गारद केला. दक्षिण आफ्रिकेचा डाव 95 धावांत संपुष्टात आला.

त्याआधी दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल व शुभमन गिल या सलामीच्या जोडीने 29 धावांची भागीदारी करताना आश्वासक सुरुवात करून दिली; मात्र केशव महाराजच्या एकाच षटकात भारताला दोन धक्के बसले. सुरुवातीला गिल आठ धावांवर, त्यानंतर तिलक वर्मा शून्यावर बाद झाला.

यशस्वी व सूर्यकुमार या जोडीने भारतासाठी किल्ला लढविला. दोघांनी 112 धावांची भागीदारी करताना भारताला संकटातून बाहेर काढले. ही जोडी खेळपट्टीवर उभी राहून धावा करणार असे वाटत असतानाच तबरेझ शम्सीच्या गोलंदाजीवर यशस्वी 60 धावांवर रिझा हेंड्रिक्सकरवी झेलबाद झाला. यशस्वीने 60 धावांची खेळी 6 चौकार व 3 षटकारांनी सजवली. दक्षिण आफ्रिकेकडून विल्यम्स व महाराज यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

कुलदीप पहिला फिरकीपटू
फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात फक्त 2.5 षटकात 17 धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये निम्मा संघ गारद करण्याची ही कुलदीपची दुसरी वेळ आहे. याचबरोबर भारताकडून टी 20 मध्ये दोनवेळा निम्मा संघ गारद करण्याची किमया करणारा कुलदीप यादव हा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे.

Exit mobile version