निगुडशेत परिसरात संशयास्पद रसायन

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; शेतजमिनीजवळ काळ्या रंगाचे द्रव्य आढळले

|तळा / प्रतिनिधी |

तळा तालुक्यातील मौजे निगुडशेत येथील शेतजमिनीलगतच्या रस्त्याच्या कडेला काळ्या रंगाचे संशयास्पद रासायनिक द्रव्य आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी स्वाती पाटील यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड उपप्रादेशिक कार्यालयाकडे रसायनाची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी अधिकृत पत्र पाठविले आहे.

निगुडशेतचे पोलीस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत संयुक्त पंचनामा केला. पंचनाम्यात रस्त्याच्या कडेला काळ्या रंगाचे संशयास्पद रासायनिक द्रव्य आढळल्याची नोंद करण्यात आली असून, त्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
त्यानंतर तहसीलदार स्वाती पाटील यांनी पंचनाम्याची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड कार्यालयाकडे पाठवून संबंधित रसायनाची तपासणी करण्याची विनंती केली आहे. तपासणीनंतर हे द्रव्य नेमके कोणते आहे, त्याचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, तसेच ते तेथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने टाकले, याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, शेतीच्या परिसरात असे संशयास्पद रसायन आढळल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version