ताडगोळ्यांना पर्यटकांची पसंती

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
चौल मधील ताडगोळे पर्यटकांची खास पंसती असून मोठी मागणी ऐन उन्हाळयात असते. चौल परिसरात ताडगोळेची असंख्य झाडे असून ताडगोळे विक्रीतून मोठे उत्पन्न स्थानिक साधतात. ऐन उन्हाळयाच्या दिवसात ताडगोळे थंडावा म्हणून पंसतीचे असते, त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातून तसेच परिसरातून आलेले पर्यटक तसेच स्थानिकवर्ग ताडगोळे खरेदी करत असल्याचे चित्र रेवदंडा-चौल बाजारपेठेत दिसते. चौलमध्ये नारळ पोफळीच्या बागेसह ताडाची झाडेसुद्धा विपूल असून त्याला येणार्‍या नारळा सारख्या फळांना ताडगोळे म्हणतात. या फळांतला गर पाणीदार व चवदार असून उंच उंच ताडाच्या झाडावर चढून काढण्याचा व फळांतील गर काढण्यास कस लागतो. उन्हाळयात येत असलेल्या ताडगोळयांना बाजारात चांगली मागणी असते. उन्हाळयाचे दिवसात अंगाची लाही लाही होत असताना नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरिरातील पाण्याचे प्रमाण टिकवून धरतात. अंगातील उष्णता कमी करणार्‍या ताडगोळयांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. ताडगोळे हे फळ ठराविक ॠतूमध्ये म्हणजे उन्हाळयात उपलब्ध असणारे फळ आहे. इंग्रजी भाषेत आईस अ‍ॅपल म्हणून ओळखले जाणारे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते. या फळामध्ये कर्करोग प्रतिरोधी तत्वे असून विशेषतः महिलांमध्ये आढळणार्‍या स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी या फळाचे सेवन उत्तम मानले जाते. या फळामध्ये अ‍ॅथोसायनिन नामक फायटोकेमिकल स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करणारे आहे. आरोग्यासाठी या फळाचे फायदे मिळविण्यासाठी उन्हाळयाच्या दिवसामध्ये या फळाचे भरपूर सेवन करावे, ज्यांना वजन घटवायचे असेल त्याच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. अश्या या गुणकारी ताडगोेळे फळांची फार मोठी मागणी उन्हाळयात पर्यटक व स्थानिक वर्ग करत असतो. चौल परिसरात आर्थिक उत्पन्न देणारे ताडवृक्ष असंख्य संख्येने असून या ताडाच्या वृक्षाच्या लागवड करणे दिवसेंदिवस गरजेचे आहे.

Exit mobile version