| रसायनी | प्रतिनिधी |
भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2026 पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 20 हून अधिक देशांतील 1,500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. वरिष्ठ शासकीय अधिकारी, चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्ती तसेच विविध क्रीडा संघटनांचे राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या स्पर्धेत रायगड नवी मुंबईच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. श्रवण भरत भोसले याने कॅडेट मुले 41 किलोखालील, तर सिद्धार्थ राजेश शाही याने सब-ज्युनिअर मुले 32 किलोखालील वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. साधिल कबीर शिवशरण याने किड्स मुले 20 किलोखालील, तर मिशय चिराग शाह याने सब-ज्युनिअर मुले 50 किलोखालील वजनी गटात रौप्यपदक मिळवून नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. याशिवाय सब-ज्युनिअर गटातील आरव हडके, कॅडेट गटातील प्राची गजरे, ज्युनिअर गटातील शिगिल शिबू आणि सीनियर गटातील मोहित गांधी यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सर्व खेळाडूंनी गुरुकुल तायक्वांदो अकादमीमध्ये मागील अनेक महिन्यांपासून
स्पर्धेच्या तयारीसाठी नियमित सराव केला होता.
या स्पर्धेतील आणखी एक अभिमानास्पद बाब म्हणजे गुरुकुल तायक्वांदो अकादमीचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय पंच तुषार सिनलकर यांना सर्वोत्कृष्ट पुरुष आंतरराष्ट्रीय पंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे अकादमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. तसेच नुपूर पावगे, चैतन्य नागणे आणि समृद्धी कापसे यांनी राष्ट्रीय पंच स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट योगदान दिले.
या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविणाऱ्या खेळाडूंना आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी भारतीय तायक्वांदो संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात थेट पात्रता मिळणार आहे. यामध्ये 2027 कॅडेट जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, 2027 वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि 2027 ज्युनिअर आशियाई अजिंक्यपद स्पर्धांचा समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.






