| महाड । प्रतिनिधी |
महाड शहरातील मध्यवर्ती परिसर म्हणून ओळखला जाणारा शिवाजी चौक या भागामध्ये नियमबाह्य फटाक्याचे स्टॉल लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. प्रशासनाकडून स्टॉल लावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी दुकानदार राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते. दाट लोक वस्ती, प्रमुख वाहतुकीचा परिसरात, फटाकेचे स्टॉल लावण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सर्व फटाक्यांचे स्टॉल काकर तळे येथील महाड नगरपालिकेच्या भिलारे मैदानावर लावण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
काही दिवसांनी सुरू होणार्या दिवाळी उत्सवानिमित्त सर्वत्र फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. शहरात देखील अनेक फटाक्याचे स्टॉल लावले जातात. शहरातील प्रमुख रहदारीचा परिसर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, लायन्स क्लब बिल्डिंग परिसर, महात्मा गांधी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, बाजार पेठ या परिसरामध्ये फटाके स्टॉल लावले जातात. हा परिसर रहदारीचा असल्याने येथे फटाक्याचे स्टॉल लावणे सर्वस्वी धोक्याचे आहे. तसेच दुचाकी, चार चाकी वाहनांचे पार्किंग शिवाजी चौक परिसरात केले जाते. अशा वरदळीच्या परिसरात फटाक्यांसारखे स्फोटक वस्तूंच्या विक्रीची दुकाने लावणे सर्वस्वी धोक्याचे आहे.
महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांनी याप्रकरणी गांभीर्याने दखल घेतली असून पवार यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे शिष्टमंडळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोडगे यांची भेट घेऊन शिवाजी चौकात फटाके स्टॉल लावण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक खोपडे यांची भेट घेऊन फटाके विक्रीचे स्टॉल लावताना योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्याची विनंती केली आहे.