| नागोठणे | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अलिबाग-रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.एस. राजंदेकर व न्यायाधीश तथा अलिबाग-रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अमोल शिंदे यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणी पट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळेच रोहा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात 28 सप्टेंबर रोजी होणार्या राष्ट्रीय लोक अदालतीत रोहा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी व पक्षकारांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन रोहा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सुनील महाले यांनी केले आहे.