स्थानिकांसमोर यक्षप्रश्न
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये बहुतेक ठिकाणी प्लास्टिकजन्य कचरा इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत दिसत असून, स्वच्छ माथेरान, हरित माथेरान, सुंदर माथेरान ही बिरुदावली हळूहळू लोप पावत चाललेली असल्याने या नयनरम्य पर्यटनस्थळाची प्रतिमा काही वर्षांपासून इथे वाढत चाललेल्या वस्तीमुळे त्याचप्रमाणे जिकडेतिकडे पॉईंट तसेच रस्त्याच्या बाजूला नजर जाईल तिकडे टपर्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या तसेच रॅपर्स पाकीट जंगलात कुठेही टाकली जात आहेत. यामुळे या गावाच्या भविष्यातील पर्यटनाबाबत स्थानिकांना यक्षप्रश्न पडलेला दिसत आहे. अनेक ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने जंगलात आणि नागरी वस्तीतसुद्धा मोठ्या प्रमाणावर कचर्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन कामी दरवर्षी जवळपास एक करोड रुपयांपेक्षाही अधिक खर्च केला जात आहे. परंतु या व्यवस्थापन ठेकेदाराचे कामगार खरोखरच आत्मीयतेने आपल्या कामाला न्याय देतात का, हासुद्धा प्रश्न स्थानिकांना सतावतो आहे. प्लास्टिक जन्य कचर्यामुळे अनेक झाडे दगावत असून, याचा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. झाडी हळुहळु लोप पावत असल्याने इथला हवेतील गारवा पूर्णपणे संपुष्टात आल्याने याठिकाणी बाराही महिने पंखा लावल्याशिवाय राहणे कठीण बाब बनली आहे. इथल्या पर्यटन वाढीच्या विकासकामाला आडकाठी आणणार्या पर्यावरणवाद्यांना या बाबी निदर्शनास येत नाहीत, परंतु भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कावर, त्यांच्या स्वातंत्र्यावर, मूलभूत सेवासुविधा तसेच अत्यावश्यक गरजेच्या सोयींवर गदा आणण्यासाठी मुंबई स्थित पर्यावरणवाद्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का, असाही प्रश्न युवा वर्गातून उपस्थित केला जात आहे.
घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचे कामगार नियोजित कामे पूर्ण करीत नसतील तर अशा ठेक्यासाठी करोडो रुपये नाहक खर्च का केला जात आहे. यापेक्षा येथील जे कुणी सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत ज्यांना खरोखरच या गावाविषयी तळमळ आहे आपले गाव कायमस्वरूपी हरित सुंदर आणि स्वच्छ असावे ही मनोवृत्ती ज्या होतकरू युवकांमध्ये आहे अशांना हा ठेका सुपूर्द करण्यात यावा जेणेकरून नगरपरिषदेची आर्थिक बचत आणि हा सर्व पैसा गावात राहू शकतो, असेही स्थानिकांमधून बोलले जात आहे.