समाजक्रांती आघाडीची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
देशाच्या स्वातंत्र्याविषयी चुकीचे व अपमानकारक वक्तव्य करून संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखावणार्या हिंदी सिनेतारका कंगना रणावत यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी समाजक्रांती आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा अध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.16) जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हिंदी सिनेमा सृष्टीतील एक सिनेतारका कंगणा रणावत यांनी 1947 च्या भारतीय स्वातंत्र्यावर अत्यंत चुकीची व देशप्रेमी जनतेच्या भावना दुखावणारी शेरेबाजी केली आहे. जवळ जवळ 150 वर्षे ब्रिटिशांच्या नियंत्रणात व जुलमी राजवटीत पारतंत्र्यात असणारा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी ब्रिटिशांचे अन्याय, अत्याचार व लुटारू, जुलमी राजवट संपविण्यासाठी लाखो करोडो देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक, नेते यांनी अनंत यातना सहन केल्या. त्या स्वातंत्र्याला भीक संबोधून सिने अभिनेत्री कंगना रणावत यांनी या सर्व हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त व देशवासियांचा अपमान केला आहे.
संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना कंगना राणावत यांनी देशाचा अपमान केला आहे. त्यांच्यावर केंद्र सरकारने योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.